हुजेरीगिरीचा कळस! लोकप्रतिनिधींनी शासकीय कार्यालयांत लावले पक्षाच्या नेत्‍यांचे फोटो!!; शासनाच्या नियमालाच हरताळ, जिल्हा परिषद, पंचायत समितीतील धक्कादायक प्रकार

 
file photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः हुजरेगिरीचा कळस कशाला म्‍हणतात हे पहायचे असेल तर एकदा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला भेट द्या. शासकीय कार्यालयात कुणाचे फोटो असावेत, नसावेत याबद्दल शासनाने वेळोवेळी परिपत्रक काढले आहे. मात्र नियमाला हरताळ फासून या लोकप्रतिनिधींनी पद मिळवून देण्यात ज्या नेत्यांचा वाटा आहे त्यांचेच फोटो आपापल्या शासकीय दालनात लावल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. यात जिल्हा परिषद अध्यक्षा, सभापती आणि पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती यांचा समावेश आहे हे विशेष.

1

जिल्हा परिषद अध्यक्षा मनीषा पवार यांच्या जिल्हा परिषद कार्यालयातील शासकीय दालनात मुकुल वासनिक यांचा फोटो, महिला व बालकल्याण सभापती ज्योतीताई पडघान यांच्या दालनात मुकुल वासनिक व काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांचा फोटो, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती पूनम राठोड यांच्या दालनात पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा फोटो लावण्यात आला आहे. बुलडाणा पंचायत समितीच्या सभापती उषाताई चाटे यांच्या शासकीय दालनात काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांचा फोटो, उपसभापती अरुणाताई पवार यांच्या दालनात राहुल बोंद्रे आणि हर्षवर्धन सपकाळ यांचा फोटो लावण्यात आला आहे.

2

नेते पाठिशी अन महापुरुष कोपऱ्यात....
लोकप्रतिनिधींनी त्यांच्या नेत्यांचे फोटो दर्शनीय भागात व येणाऱ्या जाणाऱ्या अभ्यगतांना ठळक दिसतील अशा ठिकाणी लावले आहेत. त्‍यांच्यामुळेच मी आज या पदावर पोहोचलो, भाऊंचे उपकार म्हणून पद हे सांगण्यासाठी व पक्षाच्या नेत्यांची कृपादृष्टी रहावी यासाठीच नेत्यांचे फोटो कार्यालयात लावण्याचा अट्टाहास करण्यात आल्याचे दिसून येते. याउलट ज्या महापुरुषांचे फोटो लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत ते कुठेतरी कोपऱ्यात लावण्यात आल्याने दिसते.

3

फोटो कुणाचे असावेत...
शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये कोणत्या नेत्यांचे  फोटो लावावेत हे सूचित करणारा शासन निर्णय ६ नोव्हेंबर २०१५ मध्ये सर्व कार्यालयांना पाठविण्यात आला आहे. याआधीही कोणत्या महापुरुषांची छायाचित्रे लावावी याबाबत वेळोवेळी शासन निर्णय काढून स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. १९५८, १९६२, १९८२ आणि १९८५ मध्ये हे आदेश काढण्यात आले होते. १९८५ च्या आदेशानुसार शासकीय कार्यालयात लावण्यात येणाऱ्या फोटोंमध्ये ७ महापुरुषांचा समावेश होता. २०१५ च्या निर्णयानुसार ही संख्या आता २९ झाली आहे. व्यक्‍तीगत श्रद्धा बाजूला ठेवून थोरांची छायाचित्रे लावण्यात यावी यासाठी शासनाने आदेश काढले. महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. राजेंद्र प्रसाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, व्ही. व्ही. गिरी, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. झाकीर हुसेन, पंडित नेहरू, दादाभाई नौरोजी, फक्रुद्दिन अली अहमद, वसंतराव नाईक, यशवंतराव चव्हाण, लोकमान्य टिळक, अटलबिहारी वाजपेयी, सुभाषचंद्र बोस, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, के. आर. नारायणन, डॉ. मनमोहन सिंग, डॉ. एपीजे अब्दुल कलाम, राजश्री शाहू महाराज, प्रतिभाताई पाटील, प्रणव मुखर्जी, रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच फोटो शासकीय व निमशासकीय कार्यालयात लावण्याची परवानगी आहे. मात्र अनेक कार्यालयांत खासदार, आमदार, पक्षांचे जिल्हाध्यक्ष यांचेही फोटो लावण्यात आल्याचे चित्र आहे.