गट, गण वाढवल्याचा आदेश अद्याप बुलडाण्यात धडकलाच नाही..!

 
बुलडाणा जिल्हा परिषद

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हा परिषद आणि १३ पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांची मुदत ३१ मार्चला संपत आहे. तत्पूर्वी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक होणे अपेक्षित आहे. मात्र कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि जिल्हा परिषदांच्या आधी नगरपरिषद निवडणुका होणे अपेक्षित असल्याने जिल्हा परिषद निवडणुका लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. त्यातही जिल्हा परिषद गटांची संख्या ८ ने आणि पंचायत समिती गणांची संख्या १६ ने वाढविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला असला तरी तसा लेखी आदेश जिल्हा प्रशासनाला मिळाला नसल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (निवडणूक) गौरी सावंत यांनी बुलडाणा लाइव्हला दिली.

बुलडाणा जिल्हा परिषदेच्या गटांची संख्या ६० वरून ६८ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. जिल्हा परिषद गटांची संख्या ८ ने वाढल्यास पंचायत समितीच्या गणांची संख्या सुद्धा आपोआप १६ ने वाढणार असल्याने जिल्ह्यातील पंचायत समितीच्या गणांची संख्या १३६ होणार आहे. त्यामुळे गट आणि गणांची रचना करण्यासाठी व प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी या प्रक्रियेला अजून बराच अवधी लागणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकीचा कार्यक्रम आल्यानंतर तहसील प्रशासनाला प्रत्यक्ष गट व गण रचनेची अंमलबजावणी करावी लागणार आहे. त्यानंतर आरक्षण सोडत, मतदार यादी प्रकाशन, आक्षेप असे बरेच विषय मार्गी लावण्यासाठी मोठा कालावधी लागणार आहे. त्यामुळे निवडणुका वेळेवर होण्याची शक्यता कमीच असल्याचे अधिकारीक सूत्रांनी सांगितले.

अफवा पसरली होती...
जिल्हा परिषदेची निवडणूक लढविण्यासाठी सध्या अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. मात्र आपल्या गटात कोणत्या गावांचा समावेश राहील, याची खात्री नसल्याने भावी उमेदवार गोंधळात पडले आहेत. त्यातच हे मोठे गाव कमी झाले, ते गाव वाढले... अशा अफवा पसरत असल्याने अनेकांनी बुलडाणा लाइव्हकडे विचारणा केली होती. त्यामुळे बुलडाणा लाइव्हने याबद्दल जाणून घेतले असता गट वाढविण्यासंदर्भात अजून लेखी आदेश प्राप्त झाला नसल्याने या प्रकियेसाठी अजून बराच वेळ लागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.