मेरा खुर्दच्या मुस्लिम बांधवांनी समाजासमोर ठेवला आदर्श! ठाणेदार गणेश हिवरकरांना भेटून म्हणाले, आषाढीच्या दिवशी कुर्बानी देणार नाही! लोणारच्या मुस्लिम बांधवांचाही पुढाकार

 
ghjk
अंढेरा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): २९ जूनला पवित्र आषाढी एकादशी आणि बकरी ईद हे दोन्ही सण एकाच दिवशी येत आहेत. मात्र हिंदू बांधवांच्या श्रद्धेचा सन्मान करीत मेरा खुर्द येथील मुस्लिम बांधवांनी "त्या" दिवशी कुर्बानी न देण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे. सामाजिक सलोखा टिकून राहण्यासाठी अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश हिवरकर करीत असलेल्या प्रयत्नांना चांगलेच यश मिळत असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.
 

आषाढी एकादशीच्या दिवशी हिंदु बांधव आषाढी एकादशीनिमित्त उपवासाचे व्रत करतात. तर बकरी ईदच्या दिवशी मुस्लिम बांधव बकऱ्याची कुर्बानी देत असतात. मात्र हिंदू समाज बांधवांच्या श्रद्धेचा आदर राखण्याचा निर्णय मेरा खुर्द येथील मुस्लिम बांधवांनी घेतला आहे. त्यामुळे त्या दिवशी कुर्बानी न देता बकरी ईदच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी कुर्बानी देण्याचा निर्णय घेण्यात आला. मुस्लिम बांधवांनी ठाणेदार गणेश हिवरकर यांची भेट घेऊन त्यांना तसे पत्र दिले. मेरा खुर्द च्या मुस्लिम बांधवांनी घेतलेला निर्णय कौतुकास पात्र आहे असे म्हणत ठाणेदार गणेश हिवरकर यांनी आषाढी आणि बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

लोणारमध्येही मुस्लिम बांधवांनी जपला बंधुभाव..

ghj

  दरम्यान दुसरबीड, मेरा खुर्द, शेगाव पाठोपाठ आता लोणार शहरातील मुस्लिम समाज बांधवांनी देखील आषाढीला कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतला आहे. लोणार शहरातील सर्व मशिदींच्या प्रमुख व मुस्लिम बांधवांनी एकमताने आषाढीच्या दिवशी कुर्बानी न करण्याचा निर्णय घेतला आहे. लोणार मधील मुस्लिम बांधव कुर्बानीचा कार्यक्रम ३० जून रोजी करणार आहेत.