Amazon Ad

लोणार तहसील कार्यालयात लघुशंकेचे वांधे! नागरिकांनाच काय अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही उघड्यावर उरकावा लागतो कार्यभार; स्वच्छता करायचे जीवावर आले म्हणून स्वच्छतागृहाला थेट कुलूपच लावले ​​​​​​​

 
लोणार(सचिन गोलेच्छा:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बातमीचे हेडिंग वाचून "लोकांना स्वच्छतेचे डोस पाजणाऱ्या" तहसील कार्यालयात खरच असे सुरू आहे असा प्रश्न वाचकांना पडणे स्वाभाविक आहे. मात्र हो, तुम्ही जे वाचलय ते खरचं आहे. सध्या चिखली तहसील कार्यालयाचे रुपडे पालटणारे तहसीलदार सुरेश कव्हळे जेव्हा लोणारचे तहसीलदार होते तेव्हा त्यांनी  लोणार तहसील कार्यालयाचा अक्षरशः कायापालट केला. आय.एस. ओ मानांकन मिळवणारे लोणार तहसील कार्यालय राज्यातले पहिले कार्यालय ठरले. मात्र सुरेश कव्हळे यांची बदली झाल्यानंतर लोणार तहसील कार्यालयाला पुन्हा जुने दिवस आले आहेत, सध्याच्या तहसीलदारांचा पाहिजे तसा धाक नाही. त्यामुळे कर्मचारी,स्वच्छता कर्मचारी बिनधास्त आहेत. तहसील कार्यालयात बाहेरून येणाऱ्या नागरिकांना सोडा तहसीलच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना देखील उघड्यावर लघुशंका करावी लागत असल्याचे चित्र आहे.
 

संपूर्ण तालुक्यातून नागरिक आपल्या कामासाठी तहसील कार्यालयात येतात. मात्र सुरेश कव्हळे तहसीलदार असताना ज्या झपाट्याने कामांचा निपटारा व्हायचा ती गती आता दिसत नाही. तहसीलदार गिरीश जोशींचा अधिकारी कर्मचाऱ्यांवर अंकुश नाही. साधे स्वच्छतागृह साफ करून घेणे सुद्धा तहसील प्रशासनाला जमत नाही. तहसील कार्यालयातील पुरुष प्रसाधन गृहाची अतिशय दुरावस्था झाली.

याआधी अशा आशयाचे एक वृत्त झळकल्यानंतर तहसील प्रशासनाने घाणेरड्या स्वच्छतागृहाची सफाई करण्याऐवजी स्वच्छ्तागृहाला कुलूप लावून टाकले. तहसील कार्यालयातील मोजक्या चार दोन कर्मचाऱ्यांजवळ त्याच्या चाव्या आहेत. मात्र सामान्य नागरिकांना आणि इतर अनेक कर्मचाऱ्यांना उघड्यावर लघुशंकेला जावे लागते.
तहसीलदार गिरीश जोशी यांनी ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे. एकीकडे नागरिकांना स्वच्छतेचे धडे द्यायचे अन् दुसरीकडे आपल्या प्रशासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना उघड्यावर पाठवायचे हे कुणालाही पटणारे नाही..त्यामुळे तहसीलदार महोदय, बघा तुमच्याकडून जमते का..!