भरोसा गावात घडलेल्या घटनेने सर्वत्र हळहळ! शीतलने चिमुकल्यासह स्वतःला का बरे संपवले असेल?निरागस लेकराचा काय दोष होता?

तासाभरात असं काय घडलं? पतीही घरी नव्हता अन् सासुही बाहेरगावी; काढायला गेलेला सिध्दार्थही बुडाला...

 
crime

चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील भरोसा गावात विवाहितेने स्वतःच्या २१ महिन्यांच्या चिमुकल्याला घेऊन विहिरीत उडी मारली. रात्रीच्या सुमारास दोघा मायलेकांना काढायला विहिरीत उडी मारणाऱ्या तरुणाचाही अंत झाला. एकाच घटनेत तिघांचा जीव गेला. मृतक विवाहिता शीतल आणि २१ महिन्यांचा चिमुकला देवांश या दोघा मायलेकांचे देह आज एकाच सरणावर जळत होते. यावेळी अंत्यविधीला उपस्थित साऱ्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या. चिमुकल्याचे वडील गणेश थुट्टे धाय मोकलून रडत होते. दुपारी ३ वाजता पतीला चिमुकल्याचा खेळतांनाचा व्हिडिओ पाठविणाऱ्या शीतलने तासाभरातच टोकाचा निर्णय घेतला...त्यामुळं असं काय घडलं? असा प्रश्न आता पोलिसांसमोरही निर्माण झाला आहे..

गेल्या काही दिवसांपासून मृतक शीतलच्या सासु बाहेरगावी होत्या. काल घटनेच्या दिवशी पती गणेश थुट्टे हे देखील कामानिमित्त बाहेर होते. त्यामुळे घरी शीतल आणि देवांश दोघेच होते. दुपारी देवांश कुत्र्याशी खेळत असताना त्याचा व्हिडिओ काढून शीतलने पती गणेश यांना पाठवला. त्यानंतरच्या तासाभरातच शितलने दिनकर सदाशिव जाधव यांच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

  चिमुकल्याचा मृतदेह पाण्यावर तरंगत होता....
 
 या घटनेनंतर रात्रीच्या सुमारास त्या विहिरीवर स्थानिकांची गर्दी जमली. अंढेरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी चिमुकल्या देवांशचा पाण्यावर तरंगतानाचा मृतदेह पाहून उपस्थित सगळ्यांचेच काळीज तुटत होते.यावेळी शितलचा मृतदेह मात्र पाण्यात बुडालेला होता. तो काढण्यासाठी गावातील सिद्धार्थ ने विहिरीत उडी मारली, मात्र दम तुटल्याने त्याचाही जीव गेला. त्याला वाचवायला उडी मारलेले सुगदेव त्र्यंबक थुट्टे यांचा सुदैवाने जीव वाचला.

 निरागस चिमुकल्याचा काय दोष?

कुठल्या कारणाने शीतलने आत्महत्या केली याचा उलगडा अद्याप झाला नाही. मात्र कारण काहीही असुदेत त्या बिचाऱ्या निरागस चिमुकल्याचा काय दोष होता? शितलने टोकाचा निर्णय घ्यायचाच नव्हता असंच गावकरी बोलत आहेत....