सिंदखेडराजात आढळलेली भगवान विष्णूंची मूर्ती सिंदखेडराजातच जतन केली जाणार! केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे पुरातत्व विभागाला निर्देश...

 
Bvcc
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) सिंदखेडराजा येथील राजे लखोजी जाधव यांच्या समाधीस्थळ परिसरात उत्खननात सापडलेल्या शेषशायी भगवान विष्णू मूर्तीचे जतन सिंदखेडराजा परिसरातच करण्याचे निर्देश केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी पुरातत्व विभागाला दिले.
राजमाता जिजाऊंचे जन्मस्थळ असलेल्या सिंदखेडराजा नगरीत राजे लखोजी जाधव यांच्या समाधीस्थळ परिसरामध्ये गेल्या महिन्याभरापासून उत्खननाच काम सुरू आहे. काही दिवसांपूर्वी या समाधीस्थळ परिसरातील उत्खननात शिवलिंग आढळून आले होते. त्यानंतर खोदकामात शिवमंदिराचा गाभा दिसून आला होता.
तर १९ जूनला उत्खननात शेषशायी विष्णुची मूर्ती सापडली आहे १.७ मीटर लांबीची अखंड दगडातील ही मूर्ती पुरातत्व विभागाच्यावतीने नागपूरला नेण्यात येणार असल्याची चर्चा परिसरामध्ये होती दरम्यान केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आज दिल्ली येथील पुरातत्व विभाग आणि नागपूर येथील पुरातत्त्व विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क केला. मूर्तीसोबत या परिसरातील लोकांच्या भावना जुळल्या आहेत, भगवान विष्णूच्या मूर्तीचे जतन याच परिसरामध्ये व्हावे असे निर्देश त्यांनी पुरातत्व विभागाला दिले. दरम्यान पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनीही ही मूर्ती इतरत्र हलवल्या जाणार नसून परिसरामध्ये जतन करुन पदस्थापित करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांना वर विश्वास ठेवू नये असे आवाहन ही केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आहे.