प्रलंबित पिकविमा,नुकसान भरपाई व भक्ती महामार्ग रद्द करण्यासाठीचे अन्नत्याग आंदोलन सुरूच!तहसिलदार,तालुका कृषी अधिकारी यांची आंदोलनास भेट; सरनाईक, राजपूत आंदोलनावर ठाम....

 
Jhvc

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गेल्या वर्षीचा प्रलंबित पिकविमा, नुकसान भरपाई तसेच भक्ती मार्ग रद्द करा, तालुक्यातील रखडलेले विहिरींच्या प्रस्तावांना मान्यता मिळावी,यासह शेतकरी व कामगारांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते विनायक सरनाईक व नितीन राजपूत यांनी चिखली तहसिल कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलना सुरु केले आहे.या आंदोलनाला तहसिलदार व तालुका कृषी अधिकारी यांनी आज दुसऱ्या दिवशी भेट दिली. आंदोलनकर्ते यांच्याशी चर्चा केली परंतु जो पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार नाही इतर मागण्यांच्या अनुषंगाने कारवाई होणार नाही तो पर्यंत आंदोलन थांबणार नसल्याची भुमिका आंदोलनकर्ते यांनी घेतली आहे.

 गेल्या वर्षी अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीने खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या हाता तोडाशी आलेला घास हिरावला गेला. शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते.नवीन खरीप हंगाम आला तरी सुद्धा पिकविमा कंपनी कडुन विमा देण्यास टाळाटाळ केली जात आहे.तारीख पे तारीख शेतकऱ्यांना दिली जात आहे.ज्यांना विमा दिला त्यांना अतिशय तुटपुंजी रक्कम दिली तर चिखली तालुक्यातील रब्बीतील ८७६६ तर खरीप मधील २६०१५ शेतकऱ्यांना विविध कारणे दाखवत अपात्र केले आहे.तर आज हि विमा कंपनी कडे तालुक्यातील खरीपच्या १४०६२ शेतकऱ्यांची एकुण ५ कोटी ७२ लाख तर रब्बी ची १०७४३ शेतकऱ्यांची २३कोटी ५४ लाख ऐवढी पिक विमा रक्कम बाकी आहे. २ ते ४ महिणे उलटुन सुद्धा विमा कंपनीकडुन शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम दिली जात नाही. ऑनलाइन प्रणालीमुळे ई-केवायसी करून सुद्धा हरभऱ्याची नुकसान भरपाई अडकून पडली आहे.अनेक शेतकऱ्यांच्या शेतात हरभरा असतांना यादीत नाव नसल्याने ते नुकसान भरपाई मिळणे पासुन वंचीत आहेत.तर दुसरीकडे भक्ती महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असतांना भक्ती महामार्गा करण्याचा घाट शासन घालत आहे.
   शेतक-यांचा विरोध असेल तर महामार्ग करणार नाही असे मुख्यमंत्री सांगत आहेत.तरी सुद्धा शेतकऱ्यांना नोटीस दिल्या जात असल्याने महामार्ग रद्द बाबत अमलबजावणी करुण आदेश पारीत करण्यात यावा,याबाबत शेतकऱ्यांनी नोंदवलेल्या हरकती चा एकत्रीत प्रस्ताव शासनास सादर करण्यात यावा,अशी मागणी करण्यात आली आहे. त्यासोबत चिखली तालुक्यात रोजगार हमी योजनेचे विहरींमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. त्या भ्रष्टाचाराची जलगतीने चौकशी करून तातडीने रखडलेल्या विहीर, गोठे, घरकुलाचे प्रस्ताव मंजूर करण्यात यावे, तसेच चिखली शहरा लगतची १६ गावे महावितरणे उंद्री विभागात समाविष्ट केल्याने नागरिकांची हेळसांड होत आहे, गावचे सरपंच व नागरिकांनी वारंवार मागणी करूनही महावितरण कार्यवाही करत नाही, त्यामुळे तातडीने ही १६ गावे पूर्वीप्रमाणे चिखली विभागात समाविष्ट करण्यात यावी. तर कामगार कल्याणच्या माध्यमातून राबविलेल्या जाणाऱ्या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे, 
कामगारांची मोठी आर्थिक लूट होत आहे. इतर तालुक्यात संसार किट वाटप झालेल्या असतांना चिखली तालुक्यात मात्र कामगार कल्याणच्या व संबंधित संस्थेच्या वेळ काढू धोरणामुळे अनेक कामगारांची नूतनीकरण तारीख संपली आहे व नूतनीकरणासाठी वेळ लागत असल्याने हजारो कामगार योजने पासून वंचित राहणार.
त्यामुळे तातडीने वंचित कामगारांना योजनेचे लाभ देण्यात यावा, भ्रष्ट व दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी,अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे.दरम्याण दुसऱ्या दिवशी आंदोलनाला तहसिलदार,तालुका कृषी अधिकारी,गट विकास अधिकारी व सहाय्यक निबंधक यांनी भेट दिली व मागण्यांच्या अनुषंगाने कारवाई करु असे देखील सांगितले परंतु यापुर्वी निवेदने देऊन सुद्धा कारवाई झाली नसल्याने ठोस उपाययोजना करा शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा करा, भक्ती मार्ग रद्द करण्यासाठी शासनास बाद्य करावे व मागण्या पुर्ण कराव्यात अशी भुमिका आंदोलनकर्ते यांनी घेतली आहे.या आंदोलनाला शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळतांना दिसत असुन गावा गावातील शेतकरी आंदोलनात सहभाग नोंदवीत आहेत.
मनसेचा आंदोलनाला पाठिंबा
आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांनी आंदोलनकर्ते यांना भेट दिली व महाराष्ट्र नवनिर्माण सेना ताकदीने सोबत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.