पालकमंत्री म्‍हणाले, हा वेदनांप्रती संवेदना व्यक्त करणारा सोहळा!

 
File Photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः  अजीम नवाज राही मृत्यूच्या दारातून बाहेर आले अन् त्यांना मृत्यूच्या जबड्यातून आणणारे माणसातले देव ठरले ते डॉ. आनंद निकाळजे... या दोघांचा ‘आम्ही शब्दप्रेमी’ मंडळींनी आयोजित केलेला हा सन्मान सोहळा सोसलेल्या वेदनांप्रती संवेदना व्यक्त करणारा अविस्मरणीय सोहळा असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले, तर सहकारात बुलडाणा अर्बनने जशी भरारी घेतली, तेवढीच भरारी साहित्य प्रांतात अजीम नवाज राही यांनी घेतली असून, ते खऱ्या अर्थाने ‘शब्ददौलत’ठरले असल्याच्या भावना राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी यांनी व्यक्त केल्या.

कार्यक्रमाच्या इतिहासात अनोखा ठरावा, असा भावसोहळा काल, १५ नोव्हेंबरला बुलडाणेकरांनी प्रत्यक्ष तर महाराष्ट्रातील तमाम मराठी रसिकांनी यू-ट्यूबच्या माध्यमातून ऑनलाईन अनुभवला, तो म्हणजे कोरोना काळात मृत्यूच्या जबड्यातून बाहेर आलेले अजीम नवाज राही व यासाठी त्यांच्यावर शर्थीचे प्रयत्न करणारे एमजीएम.हॉस्पिटल औरंगाबादच्या कोरोना विभागाचे प्रमुख डॉ.आनंद निकाळजे यांचा सन्मान सोहळा. भाईजींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यात अन्‍न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते मृत्यूंजयी राही व कोरोनायोध्दा डॉ.निकाळजे यांचा स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

मंचावर जि.प. अध्यक्षा सौ.मनिषाताई पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर, बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड व ‘शब्दप्रेमी’ संकल्पक राजेंद्र काळे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पत्रकार राजेंद्र काळे यांचाही सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सिध्देश्वर पवार यांनी केले. मानपत्रवाचन प्रा. गोविंद गायकी तर आभार प्रदर्शन अरुण जैन यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत समाधान सावळे पाटील, जि.प.सभापती रियाजखाँ पठाण, गजानन वायाळ, संजय पांचाळ, अरुण जैन, सिध्दार्थ आराख, नितीन शिरसाट, संजय जाधव, वसीम शेख, चंद्रकांत बर्दे, सुधीर चेके पाटील, अमर राऊत, सै. रफीक, समाधान म्हस्के, साखरखेर्ड्याचे सरपंच दाऊद सेठ, समता परिषदेचे दत्ता खरात, सौ.गायत्री काळे व सौ.कविता काळे यांनी केले.