'समृद्धी' वरील वाढते अपघात चिंतनीय; भाईजी चांडक म्हणाले, तातडीने उपाययोजना करण्याची गरज! २५ निष्पापांच्या बळींबद्दल व्यक्त केले दुःख! म्हणाले,दर ४० किमी वर असावे रिफ्रेशमेंट सेंटर..

 
dfghjk

बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): समृद्धी महामार्ग आणि त्यावर वाढते अपघात मोठा चिंतनाचा विषय आहे. मोठ्या संख्येने जाणारे बळी पाहता अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत बुलढाणा अर्बन परिवाराचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी व्यक्त केले.समृद्धी महामार्गावर उलटल्यानंतर खासगी लक्झरी बसने पेट घेतला. त्यात २५ निष्पाप प्रवाशांचा जीव गेला. या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत राधेश्याम चांडक म्हणाले, कमी वेळेत नागपूर ते मुंबईला जोडणारा समृद्धी महामार्ग तयार करण्यात आला. केंद्र व राज्य सरकारने नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाची महत्त्वाकांक्षी योजना राबवली. ७०० किलोमीटर लांबीचा हा मार्ग सर्वांसाठी खुला झाला आहे. डिसेंबर २०२२ मध्ये त्याचे लोकार्पण झाले. मात्र, या ६-७ महिन्यांत या रस्त्यावर जवळपास ३५० हून अधिक अपघात झाले. त्यात १०० च्या जवळपास प्रवासी व वाहनधारकांचा मृत्यू झाला, ही बाब मन विषण्ण करणारी व चिंतन करण्यास भाग पाडणारी आहे.

वास्तविक आजपर्यंत जेवढे अपघात झाले ते चालकाच्या अनियंत्रीत वेगामुळेच झाल्याचे वाटत असले तरी अपघातांची वाढत जाणारी संख्या पाहता प्रत्येक वेळेस वेगवेगळी कारणे समोर आली आहेत. त्यातच सिमेंट रस्त्यामुळे टायरमधील हवेचा वाढलेला दाब, यामुळे टायर फुटून होणारे अपघात, रस्त्यावर नादुरुस्त अवस्थेत उभ्या असलेल्या वाहनांमुळे झालेले अपघात, वाहनचालकांना समोरील वाहनाच्या वेगाचा न आलेला अंदाज व चालकाला लागलेली डुलकी हीदेखील अपघातांची कारणे आहेत. झोपेची डुलकी लागत असतानाही पुढे कुठेतरी थांबू, असा विचार करून वाहनचालक थांबत नाहीत, परिणामी अपघात घडून त्यात निष्पापांचा जीव जातो, असे चांडक म्हणाले.   

काही सेकंदांचा बेसावधपणा करतो घात 

 नागपूरच्या विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेने काढलेला निष्कर्षही चिंतन करायला लावणारा आहे, त्यांच्या मते एखादे वाहन महामार्गावर कोणत्याही अडथळ्याशिवाय सरळ रेषेत धावत असेल तर चालक त्या परिस्थितीला सरावतो व त्याची शारीरिक हालचाल स्थिर होते. चालकाचा मेंदू हा क्रिया-प्रक्रियेसाठी सक्रिय नसतो. चालकाच्या या मनस्थितीलाच महामार्ग संमोहन असे म्हटले जाते. चालक आवश्यक तेवढा दक्ष न राहिल्यामुळे त्याचा काही सेकंदाचा बेसावधपणा अपघाताला कारणीभूत ठरतो. या सर्वच बाबींवर खरेतच चिंतन होणे खूप गरजेचे असल्याचे राधेश्याम चांडक यांनी म्हटले आहे. 


विविध सुविधांची आवश्यकता

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर जवळपास याच वेगाने वाहने चालतात. परंतु त्याठिकाणी अशा प्रकारचे अपघात होत नाहीत. अर्थात ही खूप समाधानाची बाब आहे. मला तरी असे वाटते की मुंबई-पुणे हा वळणाचा असलेला रस्ता ठराविक अंतरावर असलेले रिफ्रेशमेंट सेंटर व मोठ्या प्रमाणातील वाहनाची वर्दळ यामुळे तेथील अपघाताचे प्रमाण नगण्य आहे, तर मग तशीच सुविधा समृद्धी महामार्गावर का नसावी? हा ही एक चिंतनाचा विषय आहे. या सर्व परिस्थितीवर फक्त चिंतन करून काही होणार नाही तर त्यावर उपाययोजना तात्काळ होणे गरजेचे असल्याचे राधेश्याम चांडक म्हणाले.

दर ४० किमीवर असावे रिफ्रेशमेंट सेंटर..

समृद्धी महामार्गावर फक्त पेट्रोलपंपाची व्यवस्था आहे. पण वाहनातील प्रवाशांना रिफ्रेशमेंटची व्यवस्था नाही. हॉटेल किंवा नादुरुस्त वाहनांच्या दुरुस्तीची व्यवस्था उपलब्ध नाही. दूरदूरपर्यंत थांबण्यायोग्य जागा उपलब्ध नसल्यामुळे वाहनचालक थांबत नाहीत. त्यामुळे वरील कुठले तरी कारण आपघातास कारणीभूत ठरत असावे. यासाठी शासनाने दर ४० किलोमीटर अंतरावर रिफ्रेशमेंट सेंटर तत्काळ सुरू करणे गरजेचे आहे. त्याठिकाणी पेट्रोलपंप, हॉटेल, वाहन दुरुस्तीच्या व्यवस्थेसोबतच टोईंगव्हॅन दवाखाना, रुग्णवाहिकेची व्यवस्था करणे गरजेचे आहे असे भाईजी म्हणाले.