Amazon Ad

शासनाची उत्कृष्ट गणेशोत्सव स्पर्धा! सहभागी होण्याची आज, १५ सप्टेंबर अंतिम मुदत! ५ लाख रुपयांचे पहिले बक्षीस! नोंदणी कशी करायची ते बातमीत वाचा....

 

बुलडाणा( जिमाका): राज्य शासनाने १९ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मुंबई, मुंबई (उपनगर), पुणे, ठाणे या जिल्ह्यातून प्रत्येकी ३ आणि अन्य जिल्ह्यातून प्रत्येकी १ याप्रमाणे एकूण उत्कृष्ट ४४ गणेशोत्सव मंडळाची निवड करण्यात येणार आहे. यासाठी गणेशोत्सव मंडळांना दि. १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत नोंदणी करावी लागणार आहे.

राज्यभरातील ४४ गणेशोत्सव मंडळांमधून पहिल्या क्रमांकाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळास ५ लाख रुपये, द्वितीय क्रमांकास २.५० लाख रुपये आणि तृतीय क्रमांकास १ लाख रुपये रकमेचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे, तर उर्वरित ४१ गणेशोत्सव मंडळांस राज्य शासनाकडून प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

            स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ई-मेलवर अथवा संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयात दि. १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत नोंदणी करावी लागणार आहे. स्पर्धेची अधिक माहिती आणि अर्ज  pldeshpandekalaacademy.org या संकेतस्थळावरही उपलब्ध आहेत. या स्पर्धेत जास्तीत जास्त गणेशोत्सव मंडळानी भाग घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. तसेच या स्पर्धेत जिल्ह्यातील नोंदणीकृत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.