शासन आपल्या दारी पण लोणार पंचायत समितीचे कर्मचारी ५ च्या आत आपापल्या घरी! बुलडाणा लाइव्ह च्या कॅमेऱ्यात कैद झाल्या रिकाम्या खुर्च्या; गटविकास अधिकारी म्हणाले, कारवाई करतो...

 
Vzbzb
लोणार(सचिन गोलेच्छा:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): नुकताच जिल्ह्यात शासन आपल्या दारी कार्यक्रम झाला. लाभार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात हजर करतांना प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली. मुख्यमंत्री येणार म्हणून अधिकारी ,कर्मचारी चांगलेच कामाला लागलेले दिसत होते. मात्र आता मुख्यमंत्री निघून गेल्यावर कर्मचारी पुन्हा एकदा जैसे थे स्थितीत आल्याचे चित्र आहे ते लोणार पंचायत समितीत.. हो त्याच झालं असं की आज,५ सप्टेंबरला सायंकाळी ५ च्या सुमारास बुलडाणा लाइव्ह चा कॅमेरा लोणार पंचायत समिती कार्यालयात फिरला,तेव्हा लोणार पंचायत समितीचे बहुतांश अधिकारी, कर्मचारी वेळेआधीच घरी गेल्याचे दिसून आले.
 शासकीय कर्मचाऱ्यांना कार्यालयात वेळेवर हजर राहण्याचे व निश्चीत वेळेपर्यंत काम करण्याचे बंधन आहे. एखादवेळेस आपत्कालीन परिस्थितीत एखाद्या कर्मचाऱ्याला वरिष्ठांच्या परवानगीने वेळेआधी कार्यालय सोडता येते. लोणार पंचायत समिती कार्यालयात शिपायांना ९:३० तर अधिकारी कर्मचाऱ्यांना ९:४५ ला पोहचणे अपेक्षित आहे, तर कार्यालय सुटण्याची वेळ ही ६:१५ ते ६:३० अशी आहे. मात्र आज ५ सप्टेंबरला ५ च्या आधीच कर्मचारी गायब असल्याचे दिसले. त्यामुळे शासन आपल्या दारी अन् कर्मचारी ५ च्या आत घरी असे चित्र लोणार पंचायत समितीत दिसले. कर्मचाऱ्यांच्या या हलगर्जीपणामुळे नागरिकांची मात्र गैरसोय झाली..
कारवाई करतो...
दरम्यान यासंदर्भात बुलडाणा लाइव्ह ने गटविकास अधिकारी, उमेश देशमुख यांच्याशी संपर्क साधला. आपण शासकीय कामासाठी फिल्डवर असल्याचे ते म्हणाले. काही कर्मचारी कार्यालयीन कामकाजासाठी बुलडाणा येथे गेले होते,मात्र आज कार्यालयात हजर असताना जे वेळेच्या आधीच घरी गेले त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे उमेश देशमुख म्हणाले.