बुलडाणा शहरातल्या गुंडांना धास्ती! आता २६ महत्वाच्या ठिकाणी ९९ सीसीटिव्ही कॅमेरे! पोलिसांच्या नजरेतून कुणीच सुटणार नाही!
Nov 6, 2023, 08:52 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा शहरावर वॉच ठेवण्यासाठी पोलिसांच्या मदतीला आता ९९ सीसीटिव्ही कॅमेऱ्यांची मदत होणार आहे. पोलीस बळकटीकरण योजनेअंतर्गत जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या योजनेला मंजुरात मिळाली असून काल त्याचे उद्घाटन झाले. आमदार संजय गायकवाड यांच्यासह जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते.
बुलडाणा शहरातील अतिमहत्वाच्या अशा २६ ठिकाणी हे ९९ कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. शहरातील इक्बाल चौक, टिपू सुलतान चौक, आठवडी बाजार, जयस्तंभ चौक, कोर्ट चौक, कारंजा चौक, संगम चौक,राजमाता चौक, सोसायटी पेट्रोलपंप चौक, गजानन महाराज चौक, चावडी चौक, एडेड चौक, भोंडे सरकार चौक यासह इतर महत्वाच्या ठिकाणी हे कॅमेरे बसवण्यात येणार आहे. आमदार गायकवाड यांच्या सहकार्याने या प्रस्तावास मंजुरी मिळाली.या कॅमेऱ्याच्या माध्यमातून शहरातील घटनांवर २४ तास पोलिसांची नजर राहणार आहे, यासाठी एक विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे.