कॉपीमुक्त अभियानासाठी जिल्हा परिषद प्रशासन ॲक्शन मोडवर! सीईओ विशाल नरवाडेंनी सांगितला प्लॅन;झूम मिटिंगद्वारे परीक्षार्थींवर केली जाणार देखरेख...

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): उद्यापासून राज्यात बारावी बोर्ड परीक्षेला सुरुवात होणार आहे. परीक्षेदरम्यान कॉपी मुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी केले. येथील जिल्हा परिषदेत आयोजित पत्रकार परिषदेत आज २० फेब्रुवारी रोजी ते बोलत होते.
 बारावी बोर्ड करिता जिल्ह्यातील १३ तालुक्यात एकूण ११७ परीक्षा केंद्र आहेत. त्यातील १३५० वर्गखोल्यांत झूम मिटिंगच्या साह्याने मोबाईलद्वारे देखरेख करण्यात येणार असल्याचा नावीन्यपूर्ण प्रयोग त्यांनी सांगितला. कॉपी मुक्त अभियान कागदापुरते मर्यादित न राहता आपण प्रत्यक्षरित्या अंमलबजावणी करणार असून त्या पद्धतीचे नियोजन झाले असल्याचे सिईओ नरवाडे यांनी सांगितले. परीक्षा केंद्रावर पुरुष परीक्षार्थीची झडती घेण्यासाठी पोलीस पाटील, कोतवाल, शिक्षकेत्तर कर्मचारी असणार आहे. तर महिला परीक्षार्थीची झडती महिला कर्मचारी, अंगणवाडी सेविका घेणार आहेत. जेणेकरून कॉपी पूर्ण पणे रोखली जाईल. सोबतच बैठी पथक गठीत करण्यात येणार असून परीक्षेच्या पूर्ण वेळ पथकातील अधिकारी, कर्मचारी केंद्रावर हजर असतील. तसेच १३ तालुक्यातील प्रत्येक केंद्रावर येणाऱ्या भरारी पथकात जिल्हा परिषदेतील अधिकारी कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याबरोबरच अचानक झडती घेण्यासाठी पोलीस कर्मचारी उपस्थित राहणार आहे. असेही सीईओ नरवाडे यांनी सांगितले.