बुलढाण्यात धनगर समाज आक्रमक! आधी काढला मोर्चा, नंतर रोखला रास्ता! म्हणाले घटनेत आरक्षण पण..
Updated: Feb 12, 2024, 16:30 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळावे, मिळालेल्या आरक्षणाची पूर्णपणे अंमलबजावनी व्हावी यामागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील १५ दिवसांपासून नंदू लवंगे यांचे आमरण उपोषण सुरू आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज सोमवार,१२ फेब्रुवारीला मोर्चा काढण्यात आला. येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नियोजित स्मारकापासून मोर्चा काढण्यात आला. त्यांनतर जिजामाता क्रीडासंकुल समोरील प्रांगणात मोर्चाचा समारोप झाला. मात्र त्यांनतर दुपारी मोर्चेकरी समाज बांधवांनी आक्रमक पवित्रा घेत रास्ता रोखो करत निदर्शने केली, त्यावेळी काही काळ मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
शेकडो पोलिसांच्या बंदोबस्तात मोर्चा काढण्यात आला. तहसील चौक, भोंडे सरकार चौक, कारंजा चौक, बाजारलाईन, व जयस्तंभ चौक यामार्गाने मोर्चा संपन्न झाला. धनगर समाजातील शेकडो बांधवांनी मोर्चात सहभाग नोंदविला. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचा या घोषणांनी शहर परिसर दुमदुमून गेला होता. त्यांनंतर धनगर बांधवांनी आक्रमक पवित्रा घेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्ता रोको आंदोलन सुरू केले. यावेळी दुपारी शहराच्या मुख्य रस्त्यात वाहतुकीची मोठी अडचण निर्माण झाली होती.
...तर मतदानावर बहिष्कार टाकू!
यावेळी माध्यमांशी बोलताना धनगर बांधव म्हणाले की, आधीपासूनच घटनेत आम्हाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळाले आहे.मात्र त्यावर अंबलबजवानी करण्यात येत नाही. सरकाने आमच्या याच मागणीचा विचार करावा अन्यथा रोषाला सामोरे जावे लागेल , जर सरकारने आंदोलनाची दखल घेतली नाही, तर आम्ही मतदानावरही बहिष्कार टाकू असा इशाराही त्यांनी दिला.