प्रतापराव जाधवांच्या विरोधातील उमेदवाराचे डिपॉझीट जप्त होईल! चिखलीच्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा! खामगाव जालना रेल्वेमार्गासाठी ५० टक्के वाटा देण्याचा दिला शब्द!

खा. प्रतापराव जाधवांचेही भाषण गाजले, म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यकाळातच....
 
Ghj
चिखली(कृष्णा सपकाळ:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखलीच्या तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावरील शिवसंकल्प सभा दिमाखदार ठरली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण लक्षवेधी ठरले. हा तर शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा आहे, जेव्हा महायुतीची सभा होईल तेव्हा विरोधकांचे पानिपत होईल. शिवसेनेचे हे कार्यकर्ते जोमाने लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले की विरोधकांचे डिपॉझीट जप्त होईल असे प्रतिपादन यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. यावेळी मंचावर खा.प्रतापराव जाधव, आ. संजय गायकवाड, अस.संजय रायमुलकर, आ.संजय शिरसाट, जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, शांताराम दाणे यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्वच तालुकाप्रमुख उपस्थित होते.
पुढे बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्याचा कारभार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने सुरू आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील सर्वसामान्यांचे समर्थन मिळत आहे. नाव छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि कृती मात्र अफजलखानाचे समर्थन करणारी असे आमचे काम नाही असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना लगावला. लोकशाहीत बहुमताचा महत्व आहे असे मी आधीपासूनच सांगत होतो, विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालाने आता त्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालामुळे विरोधकांचा आता थयथयाट होत आहे असेही ते म्हणाले.
  राज्याचे शासन लोकाभिमुख निर्णय घेत आहे. २ कोटी २० लाख लोकांना शासन आपल्या दारी या उपक्रमामुळे योजनांचा लाभ मिळाला असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. शासनाचं काम लोकांपर्यंत पोहचवा, बूथ प्रमुख नेमा, शिवदूत नेमा अशा सूचना यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या..
खामगाव जालना रेल्वेमार्गासाठी ५० टक्के वाटा..
 खामगाव जालना रेल्वेमार्गासाठी राज्यसरकार ५० टक्के हिस्सा देणार आहे, कारण हे सरकार सर्वसामान्यांचं आहे. तुमच्या मागण्या पूर्ण करण्याचं काम हे सरकार करेल अशी घोषणा यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. या राज्याचा मुख्यमंत्री शेतकऱ्यांचा मुलगा आहे. मी तुमच्यातलाच एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांची मला जाण आहे. शेतकऱ्यांना हे सरकार वाऱ्यावर सोडणार नाही असा शब्द देत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. आमच्यासारख्या फाटक्या कार्यकर्त्यांनी शिवसेना वाढवली, अनेक कार्यकर्त्यांनी घरादारावर तुळशीपत्र ठेवले..तुमचं काय योगदान? तुम्ही कितीदा जेलमध्ये गेले? आयत्या बिळात नागोबा असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना नाव न घेता यावेळी लगावला. आधी कार्यकर्त्यांचे खच्चिकरण होत होते म्हणून आम्ही उठाव केला असे एकनाथ शिंदे म्हणाले. राज्यात आणि केंद्रात सध्या विकासकामांचा झंझावात सुरू आहे. जे आतापर्यंत झाले नाही ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करून दाखवले. आपल्या सर्वांचे स्वप्न असलेले प्रभू श्रीराम चंद्राचे मंदिर आता साकारल्या जात आहे असे म्हणत "जो राम का नही वो किसी काम का नहीं" हे ध्यानात ठेवा असेही मुख्यमंत्री म्हणाले. लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करा असे आवाहन शेवटी मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.
खा.प्रतापराव जाधवांचे भाषण गाजले...
  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाआधी झालेले खा.प्रतापराव जाधव यांचेही भाषण चांगलेच गाजले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी का उठाव केला याची कारणे समजून घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. बाळासाहेबांच्या कारकीर्दीत शिस्तबध्द संघटन म्हणून शिवसेनेची ओळख होती. मात्र एकनाथ शिंदे यांच्यासारखा एक सामान्य शिवसैनिक उठावाचा झेंडा हाती घेतो,आणि महाराष्ट्रातून मोठ समर्थन घेतो याची कारण शोधण्याची गरज असल्याचे खा.जाधव म्हणाले. २०१९ मध्ये नरेंद्र मोदी आणि बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो वापरून लोकसभा आणि विधानसभा लढली मात्र त्यानंतर ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने बाळासाहेबांना हयातभर विरोध केला त्या पक्षाच्या मांडीला मांडी घालून बसायला भाग पाडलं.अडीच वर्षात मुख्यमंत्री खासदार आणि आमदारांना भेटत नव्हते, जिल्हा प्रमुखांना भेटत नव्हते, संघटनेत असंतोष होता..या असंतोषाला वाट मोकळी करून देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी उठावाचा झेंडा हाती घेतला. आता महाराष्ट्रात गाव खेड्यांचा सर्वांगीण विकास होत आहे. ज्या गावाला लाख रुपयांचा निधी मिळत नव्हता त्या गावाला १० - १० कोटी रुपये निधी मिळत असल्याचे खा.जाधव म्हणाले. शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारने विविध योजना राबविल्या आहेत. केंद्राच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर एकनाथ शिंदे यांनीही राज्याची स्वंतत्र योजना आणली, त्यामुळे केंद्र आणि राज्याचे मिळून शेतकऱ्यांना आता वर्षाला १२ हजार रुपये मिळतात असे खा.प्रतापराव जाधव म्हणाले. महिलांसाठी केंद्र आणि राज्य सरकारने बचतगटांना प्रोत्साहन देण्याचे काम केले. जिल्ह्यातील महिलांच्या बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालासाठी विक्री केंद्र सुरू केल्याची बाब खा.जाधव यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिली. 
या मागण्या केल्या...
  खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी 
राज्याने ५० टक्के वाटा उचलावा अशी मागणी यावेळी खा प्रतापराव जाधव यांनी मुख्यमंत्र्याकडे केली. खामगाव जालना रेल्वेमार्ग हा मुख्यमंत्री शिंदे यांच्या कारकिर्दीतच होणार आहे असा विश्वासही यावेळी खा.जाधव यांनी व्यक्त केला.
बुलडाणा जिल्हा अवर्षण ग्रस्त आहे, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत. वैनगंगा - नळगंगा नदीजोड प्रकल्पाचा सर्व्हे सुरू आहे त्यात आणि पैनगंगा नदी देखील जोडावी अशी मागणी यावेळी खा.जाधव यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी खा.प्रतापराव जाधव यांच्या दोन्ही मागण्या मान्य करीत असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रख्यात निवेदक गणेश 
धुंदाळे यांनी केले.मुख्यमंत्री शिंदे यांनी धुंदळे यांचे कौतुक केले.