चिखली आगारावर गरिबीचे दिवस! कालपासून डिझेल नाही,अनेक बसफेऱ्या बंद! अव्वाच्या सव्वा देऊन खाजगी वाहनाने करावा लागतोय प्रवाशांना प्रवास...

 
jkd

चिखली(गणेश धुंदाळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा जिल्ह्यातील मध्यवर्ती असलेल्या चिखली आगारावर गरिबीचे दिवस आल्याचे चित्र आहे. कालपासून बस डेपोतील डिझेल संपलेले आहे अद्याप डिझेल प्राप्त झालेले नाही.

 महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून एस टी बसेससाठी डेपोतच पेट्रोल पंप उभारण्यात आले आहेत. मात्र अनेकदा आर्थिक अडचणीमुळे म्हणा किंवा नियोजनाच्या अभावाने डेपोतील पंपावर डिझेलचा तुटवडा असतो. चिखली डेपोत काल दुपारपासून पासून डिझेल नसल्याने ग्रामीणच्या अनेक फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. सकाळपासून चिखलीवरून बुलडाण्यासाठी बसेस सोडण्यात आलेल्या नाही. त्यामुळे अव्वाच्या सव्वा भाडे देऊन प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. 

आगारप्रमुख म्हणतात..

चिखली आगाराला दिवसाला ४ हजार लिटर डिझेल लागले. काल दुपारपासून डिझेल नाही, त्यामुळे काही फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. याबाबत वरिष्ठ पातळीवर बोलणी सुरू असल्याचे चिखली आगाराचे प्रमुख श्री. इलामे यांनी "बुलडाणा लाइव्ह" शी बोलताना सांगितले.