काउंटडाऊन सुरू, दिलं की धडकने तेज..! लोकसभेचा निकाल अवघ्या १० दिवसांवर; बुलडाणा लोकसभा मतदारसंघात कोण मारतंय बाजी? वाचा...
May 24, 2024, 10:12 IST
बुलडाणा(कृष्णा सपकाळ:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): २६ एप्रिलला बुलडाणा लोकसभेसाठी मतदान झाले. २१ उमेदवारांचे भाग्य त्या दिवशी सायंकाळी इव्हीएम मशीन मध्ये बंद झाले. आता ४ जूनला या उमेदवारांच्या भाग्याच्या पेट्या उघडणार आहेत. २१ पैकी एकाचे नशीब चांगलेच फुलणार असून २० उमेदवारांचा निवडणुकीत पराभव होईल. संपूर्ण भारतालाच या दिवसाची प्रतीक्षा लागली असून तो दिवस आता जवळ येऊ लागला आहे..तुमच्याकडे काय चाललय,आमच्याकडे हे चाललय असं म्हणता म्हणता अंदाज लावता लावता जवळपास महिना कसा संपत आला हे देखील कळले नाही..आता निकाल अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपल्याने उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांची, राजकीय विश्लेषकांची, सट्टेबाजांची "दिल की धडकने तेज" झाली आहेत, जसा जसा निकाल जवळ येईल तशी त्याची गती आणखी वाढणार आहे..बुलडाणा लोकसभा मतदारसंघापुरत बोलायचं झाल्यास इथे कुणाचं नशीब फुलणारं याची उत्सुकता मतदान करणाऱ्या ११ लाख ५ हजार मतदारांना लागून आहे..
२६ एप्रिलला मतदान झाल्यानंतर निकालासाठी जवळपास सव्वा महिन्यापेक्षा जास्त काळ प्रतीक्षा करावी लागणार म्हणून अनेकजण टेन्शन मध्ये होते.. हल्ली लोकांना सगळ काही इन्स्टंट पाहिजे त्यामुळे संयम ही बाब दुर्मिळ झालीय..मात्र संपूर्ण भारतभराचा विचार करता सगळे टप्पे आटोपल्याशिवाय निकाल शक्यच नव्हता..तर असो..निकालाच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांना जवळपास महिना आटोपत आलाय ही दिलासा देणारी बाब आहे..आता अवघ्या काही दिवसांचा संयम ठेवल्यानंतर तो महानिकालाचा महादिवस उजाडणार आहे. बुलडाणा लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचे प्रतापराव जाधव, महाआघाडीचे नरेंद्र खेडेकर, अपक्ष रविकांत तुपकर अशी तिरंगी लढत दिसत आहे. शेवटच्या दोन दिवसांत गठ्ठा मतांचा मेळ जमल्याने नरेंद्र खेडेकर जाम खुश दिसत असून त्यांना विजयाचा प्रचंड विश्वास आहे. प्रतापराव जाधवांची ओळखच संयमी नेता असल्याने ते शांतीत क्रांती करणारे आहेत, त्यामुळे यंदा कमी फरकाने का होईना पण बाजी आपलीच असा विश्वास खा.जाधव यांच्या समर्थकांना आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी या निवडणुकीत चांगलीच रंगत भरली. अपक्ष उमेदवार केवळ तगडे आव्हानच नाही तर विजयाच्या शर्यतीत उतरू शकतो हे तुपकर यांनी दाखवुन दिले, शेकडो गावांत तुपकर यांना एकूण मतदानाच्या ७० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे रविकांत तुपकर देखील विजयाच्या शर्यतीत असल्याचा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. गेल्या वेळेप्रमाणे यंदा वंचितला मतदारांची फारशी पसंती मिळाली नाही. जी गठ्ठा मते वंचितची मिळणार असे सांगण्यात येत होते,ती यंदा महाविकासआघाडीला मिळाली. वंचितमुळे महाविकास आघाडीचे नुकसान होते हा इतिहास असला तरी यंदा नुकसानीची तीव्रता कमी असण्याची शक्यता आहे. अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांनी जबरदस्त प्रचारयंत्रणा राबवली, अल्पकाळात ते जिल्ह्यातील परिचित चेहरा बनले त्यामुळे ते किती मते घेणार याकडेही सगळ्यांच्या नजरा लागून आहेत. या निवडणुकीत अपयश आले तरी संदीप शेळके यांनी राजकीय वर्तुळात मोठी जागा काबीज केली आहे हे नाकारता येणार नाही..एकंदरीत बुलडाणा लोकसभेची निवडणूक यंदा चांगलीच रंगली असून आता रंग कोण उधळणार हे ४ जूनला कळणार आहे..तोपर्यंत ठेवा संयम...