आधुनिक शेतीचा कॉमन फॅक्टर ; पोळ्यात सहभागी शेकडो ट्रॅक्टर !मेहकरात ट्रॅक्टरपोळ्याची अभिनव परंपरा..
Sep 3, 2024, 18:51 IST
मेहकर(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): शेतकऱ्यांसोबत शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे पोळा. शेतकऱ्याला सर्जा राजाचा लागलेला लळा पोळ्याच्या दिवशी प्रत्यक्ष दिसून येतो. कृषीसंस्कृतीत वृषभ राजाचे अनन्यसाधारण महत्व असताना वृषभ राजांच्या संख्येत होणारी घट चिंतनाचा विषय आहे. शेतीपद्धतीमध्ये दिवसेंदिवस बदल होताना दिसत आहे. शेतीला आधुनिकतेची जोड मिळत असून, नांगरणी, पेरणी अशा कामांसाठी यंत्रांचा उपयोग मोठ्या प्रमाणात होत आहे. ट्रॅक्टर तर आधुनिक शेतीचा कॉमन फॅक्टर बनला आहे. ही बाब लक्षात घेऊन बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरवासीयांनी पोळा सण साजरा करण्यासाठी अभिनव परंपरा जोपासली आहे. येथे चक्क ट्रॅक्टर पोळा भरत असून, शेकडो शेतकरी आपले ट्रॅक्टर घेऊन सहभागी होतात.
बैलांची आणि ट्रॅक्टरांची उपयोगिता सारखीच असल्याचे मत मेहकर येथील शेतकऱ्यांचे आहे. दरवर्षी येथे ट्रॅक्टर पोळ्याचे आयोजन करण्यात येते. शेतकऱ्यांसोबत रात्रंदिवस शेतात राबणाऱ्या बैलाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वत्र पोळा मोठ्या उत्साहात साजरा केल्या जातो. पोळा सणाचा उत्सव कायम राहण्याच्या दृष्टिकोनातून शेतकरी बांधवांच्या वतीने हा आगळा वेगळा पोळा गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. शहरातील मुख्यमार्गाने सुरू होणाऱ्या ट्रॅक्टर पोळ्यात जवळपास १५० ते २०० ट्रॅक्टर सहभागी झाले होते. शेतात सर्जाराजाच्या बरोबरीने आजच्या आधुनिक युगात योगदान देत आले आहेत, असे ट्रॅक्टर शहरातील रस्त्यावर दिसुन आले. ट्रॅक्टर पोळ्यामध्ये केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव, आ. संजय रायमूलकर,युवासेनेचे जिल्हाप्रमुख ऋषिकेश जाधव यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.
केंद्रीय मंत्री बनले ‘ट्रॅक्टरचालक’
जिल्ह्याचे भूमिपुत्र व केंद्रीय आयुष, आरोग्यराज्यमंत्री प्रतापराव जाधव हे ट्रॅक्टरचालवून पोळ्यात सहभागी झाले होते. ट्रॅक्टरपोळ्याचे नेतृत्व करत त्यांच्यामागे शेकडो शेतकरी आपपल्या ट्रॅक्टरवर सहभागी झाले होते.
रस्त्यातवर लागली ट्रॅक्टररांग..
एका रांगेत निघालेल्या ट्रॅक्टरपोळ्यात शिस्तबद्धता दिसून आली. शहरातील प्रमुख रस्त्यांवर लागलेल्या ट्रॅक्टररांगांचे चित्र सुंदर आणि लक्षवेधी ठरले.