बुलडाणा नगर परिषदेचे सहा महिन्यांचे वीजबिल थकले होते; मग काय, कापली वीज! जबाबदार कोण?

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): काल १३ डिसेंबरच्या दुपारी बुलडाणा नगरपरिषदेचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. मागील सहा महिन्याचे वीज बिल थकविल्याने महावितरणने विद्ध्युत सेवेला ब्रेक दिला होता. सुमारे ९२ हजार रूपयांचे बिल थकीत होते. मात्र पालिकेने तातडीने काल दुपारी पुर्ण वीजबिल अदा केले. त्यांनतर विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात आला. अशी माहिती महावितरणचे सहाय्यक अभियंता गिरी यांनी कळवली आहे. मात्र बिल थकविण्यासाठी नेमके कारणीभूत कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 
 जवळपास तीन- चार तास विद्युत पुरवठा ठप्प असल्याने कार्यालयीन कामे काहीकाळ खोळंबली होती. तत्पूर्वी महावितरण महामंडळाने नगरपरिषदेला १७ नोव्हेंबर रोजी नोटीस दिल्याची माहिती आहे.  
 नोटीस दिल्यानंतर पुढील पंधरा दिवसांच्या आंत विजबिल भरणे अपेक्षित होते. मात्र नगरपरिषदेने विजबील भरले नाही, त्यामुळे महावितरण विभागाला विद्युत सेवा रोखावी लागली होती. यासंपूर्ण प्रकाराला जबाबदार कोण असेल? याच्या तळाशी जाणे गरजेचे आहे. दरम्यान कोटींची कामे सांभाळत असणाऱ्या नगर परिषदेकडून विज बिल भरणे हुकले तरी कसे? तसेच कर भरण्याची सक्ती करणाऱ्याच परिषदेने कसे विजबिल हुकवले असा सवाल उपस्थित होतो आहे.