BREAKING पेनटाकळी प्रकल्प ७५ टक्के भरला! नदीकाठच्या १८ गावांना सतर्कतेचा इशारा; कोणत्याही क्षणी विसर्ग सुरू करण्याची शक्यता....
Sep 3, 2024, 16:39 IST
मेहकर(अनिल मंजुळकर: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात दोन दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे जलसाठ्यांमध्ये वाढ होत आहे. खडकपूर्णा प्रकल्प जवळपास ९४ टक्के भरला आहे. येळगाव धरणही ओव्हरफ्लो झाले आहे. आता पेनटाकळी प्रकल्प देखील आज,३ ऑगस्टच्या दुपारपर्यंत ७५ टक्के भरला आहे. हवामान विभागाने आजच जिल्ह्यात आणखी पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे, शिवाय पेनटाकळी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातून धरणात पाण्याची आवक वाढत आहे, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणत्याही क्षणी धरणाचे उघडले जाऊ शकतात त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.
पेनटाकळी प्रकल्पाच्या व्यवस्थापन विभागाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पेनटाकळी,दुधा,रायपूर,नांद्रा,पाचला,बाऱ्हई,भालेगाव,गौंढाळा,कंबरखेड,नेमतापूर,फरदापूर,मेहकर, सारंगपूर, अंत्री देशमुख,बोरी,सोनाटी व गणपूर गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीकाठच्या गावातील नागरिकांनी आपली मालमत्ता, जनावरे, पाळीव प्राणी व शेती अवजारे सुरक्षित स्थळी हलवावे असे आवाहन करण्यात आले आहे.