BREAKING लाडकी बहीण योजनेने सेतूधारकांचे वाढले टेन्शन; आज मेहकर तालुक्यात सेतूधारकांनी पुकारला बंद ? अर्ज भरण्याची प्रक्रिया खोळंबणार? प्रत्येक महिन्याला मानधन देण्याची शासनाकडे मागणी..

 
मेहकर(अनिल मंजुळकर : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत सेतूधारकांना मोफत अर्ज भरण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले. परंतु, अजूनही वेबसाईट सुरू झालेली नाही. योजनेच्या अर्ज प्रक्रियेसाठी ऑनलाइन सेतू दुकानासमोर रांगाच्या रांगा लागल्याचे दिसत आहे. असे असताना कुठलाही मोबदला मिळत नाही त्यातच होणारे कामे पण होत नसल्याने सेतू धारकांची मोठी दमछाक होत असल्याचे सेतू धारकांचे म्हणणे आहे. शासनाने दरमहा २० हजार रुपये इतके मानधन सेतू चालकांच्या खात्यात जमा करावे अशी मागणी करत मेहकर तालुक्यातील सेतू चालकांनी आज सोमवार, ८ जुलै रोजी बंद पुकारला आहे. हा बंद जिल्हा पातळीवर देखील होण्याची शक्यता आहे.
  अंगणवाडी सेविका लाडकी बहीण योजनेचे ऑफलाईन अर्ज भरण्याचे काम शासनाने दिले. यामध्ये त्यांना ५० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. अनेक महिला सेतूमध्येही जात आहेत. मात्र सेतू चालकांना किती मानधन मिळणार याबाबत शासनाने अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. आम्हालाही पोटपाणी आहे, आमच्याकडे जी मुले काम करतात. त्यांना पगार द्यावा लागतो, विज बिल व इतर खर्चही आहे. योग्य तो मोबदला शासनाने सेतू धारकांना दिला पाहिजे अशी मागणी होत आहे. जर शासनाने मोबदला दिला नाही तर आम्हीही काम करणार नाही असा इशारा मेहकर तालुक्यातील विविध सेतूधारकांनी दिला आहे. आज मेहकर तालुक्यामध्ये सेतूधारकांनी बंद पुकारला आहे.