तपोवन देवी परिसरातून हरवलेल्या राधिकाचा मृतदेहच सापडला! दगडाने ठेचले..कुणी केली हत्या?

 
Vhhg
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील रोहडा येथील तपोवन देवी संस्थान येथून काल,१२ मे रोजी एक ६ वर्षीय मुलगी हरवली होती. अंढेरा पोलीस ठाण्यात मुलीच्या कुटुंबीयांनी तक्रार दिली होती. ठाणेदार गणेश हिवरकर यांनी शोध पत्रिका काढून मुलीचा शोध घेणे सुरू केले होते. मात्र मुलगी सापडली नव्हती.अखेर आज १३ मे रोजी मुलगी सापडली आहे, मात्र तिचा मृतदेहच पोलिसांच्या हाती लागला आहे. तपोवन येथील देवीच्या  मंदिराच्या पाठीमागील भागात ५०० मीटर अंतरावर मुलीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मुलीचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचे दिसत आहे.

अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील विलास इंगळे एका लग्नासाठी चिखलीला आले होते, काल ते तपोवन ला गेले होते. त्याच वेळी त्यांची मुलगी राधिका तिथून गायब झाली होती. सगळीकडे शोध घेऊनही राधिका सापडली नव्हती. त्यामुळे कुटुंबीयांनी अंढेरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. मुलीच्या शोधासाठी पोलिसांनी आवाहन देखील केले होते. अखेर आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास राधिकाचा मृतदेह आढळला. तिच्या चेहऱ्यावर दगडाने ठेचून तिची हत्या केल्याचे दिसत आहे.

राधिका ची हत्या कुणी आणि का केली याबाबत नेमकी माहिती अद्याप समोर येऊ शकली नाही. ६ वर्षाच्या रधिकाचे कोण शत्रू होते, निरागस मुलीची हत्या करण्याचे कारण काय असावे याबाबत पोलीस तपास करीत आहेत.