भीषण अपघात! बुलडाण्याच्या तरुणांवर काळाचा घाला; अमरावतीला लग्नाला जात असताना स्विफ्ट डिझायरचा अपघात! तिघांचा जागीच मृत्यू; तिघे जखमी

 
dead
बुलडाणा/अमरावती(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): बुलडाणा जिल्ह्यातील तरुणांचा अमरावती जिल्ह्यात भीषण  अपघात झाला. दर्यापूर अमरावती रस्त्यावर आज,१३ एप्रिलच्या सायंकाळी हा अपघात झाला. या अपघातातील बुलडाणा शहरातील २ व लासुरा ( जि.अमरावती) येथील एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. बुलडाण्याचे तिघे तरुण गंभीर जखमी असून दोघांना आयकॉन हॉस्पिटल अकोला तर एकावर दर्यापुरात उपचार सुरू आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष पवन देशमुख यांच्या लग्नाला जात असताना हा अपघात झाला.
 

car 

प्रफुल्ल गावंडे (२८), प्रतीक रमेश राऊत(२७, दोघे रा. रामनगर, बुलडाणा) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत तर ज्या दुचाकीसोबत धडक झाली तो लासुरा येथील दुचाकीस्वार देखील ठार झाला आहे. पवन तायडे, शुभम नागपुरे आणि शुभम दुर्गे हे तिघे जखमी आहेत. पवन आणि शुभम नागपुरे यांच्यावर अकोल्यातील आयकॉन हॉस्पिटलमध्ये तर शुभम दुर्गे याच्यावर दर्यापुरतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दर्यापूर अमरावती रस्त्यावरील लासुरा गावाजवळ  हा अपघात झाला. स्विफ्ट डिझायर आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटारसायकलची धडक झाली. त्यानंतर स्विफ्ट डिझायर ने चार पाच पलट्या घेतल्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने उपचारासाठी रवाना केले.