भीषण अपघात! आयशर गाडीने दुचाकीला मागून उडवले; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; ५ वर्षाचा चिमुकला सुदैवाने बचावला! बुलडाणा खामगाव रस्त्यावर भादोल्याजवळ झाला अपघात...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भरधाव व अनियंत्रित आयशर वाहनाने दुचाकीला पाठीमागून उडवले. या अपघातात दुचाकीस्वार दोघांचा जागीच तर एकीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दैव बलवत्तर म्हणून दुचाकीवरील ५ वर्षाचा चिमुकला बचावला असून त्याला किरकोळ मार लागला आहे. बुलडाणा खामगाव रस्त्यावर बुलडाणा शहरापासून अवघ्या ५ किलोमिटर अंतरावर असलेल्या मोरे पेट्रोलपंपाजवळ आज,१४ ऑक्टोबरच्या सायंकाळी ५ वाजता हा अपघात झाला.
अपघातात ठार झालेले नात्याने पती-पत्नी व सून आहेत. बब्बु शेख मुंसी(५५), हमिदाबी शेख बब्बु(५०), फिरदोस अंजुम शेख नदीम(२२) अशी मृतकांची नावे असून ते भादोला येथील राहणारे आहेत. शेख नमीर शेख नदीम (४) हा चिमुकला अपघातातून सुदैवाने वाचला आहे. शेख परिवारातील चौघे दुचाकीने बुलडाण्यावरून भादोल्याकडे जात होते. यावेळी बुलडाण्याकडून खामगाव कडे जाणाऱ्या एका आयशर वाहनाने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. अपघानंतर आयशर वाहन भरधाव वेगाने खामगावकडे पळून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
  अपघातात बब्बु शेख मुंसी व त्यांची पत्नी हमिदाबी शेख बब्बु यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर बब्बु शेख मुंसी हीचा उपचारादरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. अपघातात वाचलेल्या शेख नमीर याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वृत्त लिहीस्तोवर गुन्हा दाखल झाला नव्हता..