भीषण अपघात! ईर्टीगाने उडवले,पीक अपने चिरडले; दुचाकीस्वार तिघांचा जागीच मृत्यू! दोघे गंभीर जखमी;देऊळगाव साकर्शा जवळ रात्री ८ ला झाला अपघात! उसाचा रस प्यायला ट्रीपल सीट जात होते..

 
  car
जानेफळ (अनिल मंजुळकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जानेफळ देऊळगाव साकर्शा रोडवरील उसाच्या मळ्याजवळ आज, ६ मेच्या रात्री ८ वाजता भीषण अपघात झाला. भरधाव ईर्टीगा ने दुचाकीला धडक दिली, त्यामुळे दुचाकीवरील तिघे विरुद्ध दिशेने येणाऱ्या पीकअप वाहनाखाली चिरडले. नियंत्रण हुकल्याने ईर्टीगा वाहन पलटी झाले. या अपघातात दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. अपघातात ठार झालेले तिघेही देऊळगाव साकर्शा येथील रहिवासी असल्याने गावावर शोककळा पसरली आहे.
 

लक्ष्मण गवळी (२७) इरफान शेख हुसेन(३५) आणि सचिन नहार (३४) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तिघेही दुचाकीने उसाच्या मळ्याजवळ रस प्यायला जात होते. जानेफळ कडून देऊळगाव साकर्शा कडे जाणाऱ्या ईर्टिगा कारने दुचाकीला धडक दिली. दुचाकीवरील तिघेही खामगाव कडून लग्नाचे आंधन भांडे घेऊन येणाऱ्या पिकअप वाहनाखाली चिरडले. ईर्टिगा कार चालकाचे नियंत्रण हुकल्याने कार पिकअप वाहनाला धडकून पलटी झाली. या अपघातात पिकअप चालक आणि कारचालक देखील गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच जानेफळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील गंभीर जखमीला अकोल्याला हलविण्यात आले आहे. पुढील तपास जानेफळ पोलीस करीत आहेत.