शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या गाडे बंधू विरुध्द कारवाई करा!

स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी; शेतकऱ्यांना म्हणाले उधारीत माल विकू नका..

 
Tupkar
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील व परिसरातील शेतकऱ्यांचे पैसे थकविणाऱ्या व शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या गाडे बंधूंवर  कारवाई करावी, अशी मागणी स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. 
 

रविकांत तुपकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चिखली तालुक्यातील  शेतकऱ्यांनी आपला शेतमाल चिखलीतील व्यापारी संतोष गाडे व त्यांच्या बंधूंना विकला होता. परंतु गाडे बंधूंनी आपले पैसे आर.टी.जी.एस. करतो किंवा काही दिवसांनी देतो, असे म्हणून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे पैसे थकवले आहेत व आता ते फरार असल्याची माहिती आहे. यासंदर्भात मोठ्या प्रमाणात शेतकरी तक्रारी करत आहेत. शेतकरी मोठ्या विश्वासाने आपला शेतमाल व्यापाऱ्यांना विकतात पण गेल्या काही वर्षांपासून काही व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याचे प्रमाण वाढत आहेत. दरवर्षी 5 ते 6 व्यापारी शेतकऱ्यांना कोट्यावधीचा गंडा घालून फरार होत असल्याचे प्रकरणे आमच्या समोर येत आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे अशा प्रकारावर आळा घालण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करणे गरजेचे आहे. तसेच ज्यावेळी शेतकरी व्यापाऱ्यांना आपला माल देतो त्यावेळी व्यापाऱ्यांचा आर.टी.जी.एस. करण्याचा आग्रह असतो तर त्या ऐवजी शेतकऱ्यांना रोखीने पैसे मिळण्याची व्यवस्था असावी. जेणेकरून शेतमाल विकता वेळीच शेतकऱ्यांना संपूर्ण पैसे मिळाले तरच शेतकऱ्यांची फसवणूक होणे थांबेल. तसेच फसवणूक करणाऱ्या अशा व्यापाऱ्यांवर कडक कारवाई होणे आवश्यक आहे. तरी शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या गाडे बंधूंची खाजगी संपत्ती जप्त करून शेतकऱ्यांना पैसे मिळवून द्यावे व त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाअंती रविकांत तुपकर यांनी केली आहे.

शेतकऱ्यांनी उधारीवर व्यवहार करु नये..!

दरवर्षी काही व्यापारी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फसवणूक पळून जातात त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. तरी शेतकऱ्यांनी बाजाराचा अंदाज घ्यावा, जर कोणी व्यापारी जास्त भावाचे प्रलोभन दाखवून शेतमाल उधारीवर खरेदी करत असेल तर त्याला शेतकऱ्यांनी बळी पडू नये. उधारीच्या बोलीवर व्यवहार-व्यापार न करता रोखीनेच व्यवहार करावा, आपला शेतमाल देतावेळीच संपूर्ण पैसे घ्यावे, असे नम्र आवाहन रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांना केले आहे.