मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर उतरायच्या आधी पोलिसांनी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना उचलले; हेलिकॉप्टर उडाल्यावर सोडले; विनायक सरनाईक म्हणाले, आम्ही काय आतंकवादी आहोत का?

विनायक सरनाईक यांच्या नेतृत्वात १५० ते २०० शेतकरी मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार होते. चिखलीचे व्यापारी गाडे बंधूंनी शेतकऱ्यांचा शेतमाल घेऊन कोट्यावधी रुपयांनी फसवणूक केली. त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन अटक झाली असली तरी फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना मात्र कोणतीही आर्थिक मदत मिळाली नाही, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणात लक्ष घालून पीडित शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत करावी अशी मागणी सरनाईक मुख्यमंत्र्यांना भेटून करणार होते. मात्र मुख्यमंत्र्याचे हेलिकॉप्टर उतरायच्या आधीच पोलिसांनी सरनाईक यांना ताब्यात घेतले, मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर इसरूळ येथून उड्डाण केल्यानंतरच त्यांना सोडण्यात आले. पोलिस आम्हाला गुन्हेगारासारखी वागणूक देत आहेत, आम्ही काय आंतकवादी आहोत का? शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागण्या करायच्या नाहीत तर मग कुणाकडे करायच्या? असे सवाल सरनाईक यांनी केले आहेत.