जिल्ह्यात रस्त्यावर राहणाऱ्या बालकांचे होणार सर्वेक्षण!

 
file photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोना महामारीमुळे अनेक बालकांचे मातृपितृ छत्र हरविल्यामुळे त्यांना रस्त्यावर राहावे लागत आहे. अनेक बालके रोजगार मिळवून उपजीविकेसाठी कुटुंबांसोबत स्थलांतरीत होत असून, त्यांच्या मुलभूत हक्कांचा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोविड काळात संकटात सापडलेल्या रस्त्यावर राहणाऱ्या बालकांची देखरेख व संरक्षण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झालेले असून, महिला व बाल विकास विभागाच्या समन्वयातून जिल्ह्यात विविध ठिकाणी रस्त्यावर कुटुंबासोबत राहणाऱ्या तसेच अनाथ, एकपालक, बेवारस, सोडून दिलेल्या, हरवलेल्या स्थितीत सापडलेल्या व बाल कामगार बालकांचा शोध घेण्यात येणार आहे.
सर्वेक्षण समाजातील सर्व स्तरातील नागरिकांचा, सामजिक संस्था, शासकीय अधिकारी, कर्मचारी, समाजकार्य महाविद्यालये, कामगार कार्यालय, पोलीस विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, चाईल्ड लाईन, एकात्मिक बाल विकास शहरी व नागरी प्रकल्प, रेल्वे पोलीस, महामार्ग पोलीस, शहर,वार्ड आणि ग्राम बाल संरक्षण समिती यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. कुटुंबापासून विभक्त झालेल्या अनाथ, एक पालक आणि हरवलेल्या बालकांचे पुनर्वसन करण्यासाठी आवश्यक त्या उपाय योजना जिल्हा बाल कल्याण समिती मार्फत करण्यात येणार आहेत.