असाही प्रामाणिकपणा... "शिवकृपा'च्या संचालकांना पैशांनी भरलेली पर्स सापडते तेव्हा...

 
file photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाण्यावरून पांगरीला (ता. बुलडाणा) जाताना शिवकृपा ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक सचिन सोनटक्‍के यांना सागवानजवळील जतकर यांच्या शेताजवळ पर्स आढळली. ही पर्स कुणीही उचलून घेऊन जाईल म्‍हणून त्‍यांनी गाडी थांबवून पर्सची पाहणी केली. त्‍यात साडेबारा हजार रुपये, आधार कार्ड अन्‌ दवाखान्याची फाईल होती. आधार कार्डवरून ही पर्स नांद्राकोळी येथील महिलेची असल्याचे त्‍यांच्या लक्षात आले. त्‍यांनी तातडीने फोनाफोनी करून त्‍या नावाच्या महिलेची माहिती काढली. काहीच वेळात ओळख पटली. महिलेने आपल्या नातेवाइकाला पाठवले. सोनटक्‍के यांनी पर्स त्‍यांचीच असल्याची खात्री पटवून पर्स सुपूर्द केली. त्‍यांच्या या प्रामाणिकपणाची चर्चा सध्या कौतुकाने होत आहे.

बुलडाणा शहरात शिवकृपा ड्रायव्हिंग स्कूलचे मोठे नाव आहे. वाहन शिकण्यास इच्‍छुक असलेल्यांची पहिली पसंती शिवकृपालाच असते. अगदी तालुक्याच्या ग्रामीण भागातूनही अनेक जण वाहन शिकण्यासाठी शिवकृपा ड्रायव्हिंग स्कूलमध्ये येतात. शिवकृपाचे संचालक असलेले सचिन सोनटक्‍के बुलडाण्यावरून रविवारी पांगरीला आपल्या शेतात चालले होते. सोबत अरविंद सोनटक्‍के, चंद्रनाथ सोनटक्‍के होते.

नांद्राकोळी आणि सागवानच्या मध्ये जतकर यांच्या शेताजवळ त्‍यांना पर्स आढळली. पर्सची अवस्था पाहून ती नुकतीच कुणाची तरी पडलेली असावी, असा अंदाज सचिन सोनटक्‍के यांना आला. पर्समधील आधार कार्डवरून ही पर्स लीलाबाई हुडेकर यांची असल्याचे लक्षात आले. आधार कार्डवर नांद्राकोळीचा उल्लेख असल्याने सोनटक्‍के यांनी ओळखीच्या मंडळींना संपर्क केला. त्‍यांनी तातडीने लीलाबाई यांच्याशी संपर्क करवून दिला.

लीलाबाई बुलडाण्याला दवाखान्यात जात असताना ही पर्स मध्येच पडली होती. बुलडाण्याला गेल्यावर पर्स रस्त्यातच कुठेतरी हरवल्याचे त्‍यांच्या लक्षात आल्यानंतर त्‍याही भांबावल्या होत्या. त्‍याच दरम्‍यान सोनटक्‍के यांच्याशी संपर्क झाल्याने त्‍यांच्याही जिवात जीव आला. त्‍यांनी पर्समध्ये काय काय होते, पैसे किती होते याची इत्‍यंभूत माहिती दिल्याने पर्स त्‍यांचीच असल्याची खात्री सोनटक्‍के यांना पटली. लीलाबाई यांनी नातेवाइकाला पर्स घेण्यासाठी पाठवले. सोनटक्‍के यांच्या प्रामाणिकपणामुळे लीलाबाई यांना त्‍यांची पर्स मिळाली. अन्यथा पैसे पाहून कुणीही पर्स उचलून घेऊन गेले असते.