तुपकरांना घेऊन विद्यार्थ्यांनी गाठले जिल्हाधिकारी कार्यालय!

 
file photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सध्या राज्यभरात पेपरफुटी व परीक्षा गैरव्यवहारांचे प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजत आहे. अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजेत. परीक्षेत आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी तुपकरांना घेऊन आज, १८ डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालय गाठले होते.

२१ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट २०२१ दरम्यान औद्योगिक विकास मंडळाची परीक्षा झाली. या परीक्षेत अनेक उमेदवारांनी पैसे देऊन नोकरी मिळविण्याचा प्रयत्न केला, असा आरोप जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीत करण्यात आला. १५ डिसेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने परीक्षार्थींना मिळालेले गुण आणि नावे संकेतस्थळावर प्रसिद्ध केली.

या यादीत ४९० उमेदवारांना ९९ टक्के गुण मिळाले. यात सहायक पद आणि लिपिक टंकलेखक अशा दोन पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. ज्या उमेदवारांना लिपिक टंकलेखक या पदाच्या परीक्षेत २, ५ आणि १० गुण मिळाले त्याच उमेदवारांना सहाय्यक पदाच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळाले आहेत. या उमेदवारांवर आमचा संशय असून, याप्रकरणाची दखल घेऊन शासनाने चौकशी करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. यावेळी संशयित उमेदवारांची नावे व यासंबंधीचे पुरावेसुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.