विध्यार्थी घरी, पालक शाळेत! डोणगावात जिल्हा परिषद उर्दु शाळेला ठोकले कुलूप. कारण..
Feb 15, 2024, 17:41 IST
डोणगावं(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर तालुक्यातील डोणगाव येथील जिल्हा परिषदेचा शाळेला संतप्त पालकांनी कुलूप ठोकले. शाळेत मूलभूत सुविधांचा प्रचंड अभाव असल्याचे निदर्शनास आल्याने आज १५ फेब्रुवारीला संतप्त पालकांनी पाल्यांना शाळेत पाठविलेच नाही, उलट पालकांनी शाळेत हजेरी लावली.
आधीच जिल्हा परिषदेच्या शाळांत कमी विध्यार्थीसंख्या पाहायला मिळतेय, मात्र ज्याठिकाणी विध्यार्थीसंख्या जास्त असलीतरी त्याठिकाणी सुविधाशून्य व्यवस्था पाहायला मिळाली. डोणगावच्या या शाळेत एकूण ३४७ विध्यार्थी आहेत. याठिकाणी संख्येनुसार स्वछतागृह नाही, डेक्सबेंचची सुविधा नाही त्यामुळे बालकांच्या मनावर परिणाम होत असल्याचा पालकांचा आरोप आहे. यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी आज डोणगावात अनोखे आंदोलन केले. त्यात पाल्यांना घरी ठेऊन पालक शाळेत गेले. पालकांचे आंदोलन पाहता तेथील अधिकाऱ्यांनी पालकांशी चर्चा केली. पुढील महिन्यात शाळेतील मूलभूत सुविधांसह डेक्सबेंच, व इतर साहित्य उपलब्ध करून देण्यासंबंधी पत्र आंदोलनकर्ते पालकांना देण्यात आले.