विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी घातली पाहिजे: ह.भ. प इंदुरीकर महाराज! एसपी कडासने यांनीही सांगितला संतांचा उपदेश! चिखलीत बालाजी ग्रुप आयोजित किर्तन सोहळ्याला प्रचंड गर्दी!

 
endurikar
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)::मोबाईलचा वापर किती करायचा याचे नियम केले पाहिजेत.मोबाईलवर काय पहावे काय पाहु नये याची अक्कल अनेकांना नाही. विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षकच मोबाईल व्यस्त  असतात,विद्यार्थ्यांनी काय त्यांच्याकडूनच शिकावं..खर तर शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदीच घातली पाहिजे असे प्रतिपादन कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी केले. चिखलीत बालाजी ग्रुपच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित किर्तन कार्यक्रमात ते बोलत होते. प्रारंभी जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांनीही सामाजिक विषयावर प्रबोधनात्मक भाष्य केले.
 

 sk
  अल्पवयीन मुले, मुली पळून जाण्याचे प्रमाण वाढत आहे, घरातले संस्कार दुर होत आहेत. मुलांवर पालकांचे नियंत्रण नाही. गरज नसतांना मुली पालकांजवळ मोबाईलचा हट्ट धरतातच कशासाठी असा सवाल त्यांनी उपस्थित केला. याचे परिणाम खुप वाईट होत आहेत असे ते म्हणाले. आजच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य करताना इंदुरीकर महाराजांनी लग्न कार्यात सत्कार सोहळे बंद व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. शिवाय तोरणदारी आणि मरणदारी भाषणबंदी व्हावी असेही ते म्हणाले. यंदा पाऊस कमी आहे, पर्यावरणाशी खेळल्यावर त्याचे परिणाम असेच होणार. लोकांनी आतातरी हुशार होऊन एक व्यक्ती एक झाड हा उपक्रम राबवला पाहिजे असे ते म्हणाले. पांडुरंगाच्या नामस्मरणात खरी शक्ती आहे, तशी शक्ती कशातच नाही,त्यामुळे मुखात सदैव ईश्वराच्या नामाचा जप असावा असेही इंदुरीरकर महाराज म्हणाले. 


यावेळी त्यांनी बालाजी गृपच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. समाजाला एकत्र जोडण्याचे काम बालाजी ग्रुप करीत आहे, बालाजी ग्रुपचा १०० वा वर्धापन दिन देखील व्हावा असे इंदुरीकर महाराज म्हणाले. या कार्यक्रमाला हजारो चिखलीकरांनी गर्दी केली होती.


हरीपाठ वारकरी पंथाचा आत्मा: जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने

 यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांनीही अध्यात्मिक विषयावर विवेचन केले. वारकरी संप्रदाय हा समता , बंधुत्वाची शिकवण देणारा संप्रदाय आहे. संताचा उपदेश अनमोल आहे,  संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या ,तुकोबारायांचे अंभग आजच्या घडीला देखील प्रासंगिक आहेत असे सांगत त्यांनी संतवचनांचे दाखले दिले. हरिपाठ हा वारकरी संप्रदायाचा आत्मा आहे, नामजपामध्ये जी शक्ती ती कशातच नाही असेही जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने म्हणाले.