जिल्ह्यात रात्रीच्या जमावबंदीची कडक अंमलबजावणी होणार!

 
file photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सध्या पुन्हा एकदा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांत वाढ होताना दिसत आहे. भविष्यातील रुग्णवाढ लक्षात घेता आरोग्य यंत्रणेनी सज्ज राहावे. प्रत्येकाने तोंडावर मास्क वापरावा. लसीकरण केले नसल्यास लसीकरण करून घ्यावे, दुसरा डोस आलेल्या लाभार्थ्यांनी दुसरा डोस घ्यावा. गर्दीत जाणे टाळावे. सामाजिक सुरक्षा अंतर पाळावे. कोरोना संसर्ग आटोक्यात ठेवण्यासाठी प्रत्येकाने नियमाचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले.  मास्क न वापरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध पोलीस विभागाने कारवाई करून रात्रीच्या जमावबंदी आदेशाची कडक अंमलबजावणी करावी, असे आदेशही त्‍यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्र्यांच्या दालनात काल, ७ जानेवारीला कोविड संसर्ग नियंत्रण आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी सूचना देताना पालकमंत्री बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी धनजंय गोगटे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे, अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सवडे, सहायक आयुक्त (औषध प्रशासन) श्री. बर्डे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमधील ऑक्सिजनची व्यवस्था अद्ययावत करण्याच्या सूचना करत पालकमंत्री डॉ. शिंगणे म्हणाले, की जिल्ह्यातील ऑक्सिजनची व्यवस्था पाहण्यासाठी स्वत: दौरा करणार आहे. तसेच अप्पर जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे संयुक्त पथक गठीत करावे. या पथकानेही जिल्ह्यात दौरा करून सर्व रुग्णालयांमधील ऑक्सिजनचा पुरवठा, पाईप लाईन, ऑक्सिजनचा साठा आदींची पाहणी करावी. ऑक्सिजन पुरवठा यंत्रणेची चाचणी घेऊन तपासणी करावी.

जिल्ह्यात मागील लाटेत जास्तीत जास्त १८ मे. टन ऑक्सिनची गरज होती. त्यानुसार यावेळी नियोजन करून ठेवावे. प्रत्येक पीएसए प्लांट सुरू करून तपासून घ्यावा. तसेच लसीकरणाचा वेग वाढविण्यात यावा. १५ ते १८ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण वेगाने पूर्ण करावे. त्यासाठी लसींची अधिकची मात्रा ठेवण्यात यावी, असे ते म्‍हणाले. चाचण्यांची संख्याही वाढविण्यात यावी. सध्या आरटीपीसीआर किटचा पुरवठा १०००० चा होत असून गरज १५००० ची आहे. त्यानुसार मागणी नोंदविण्यात यावी. सिंदखेड राजा येथे नवीन एलएमओ टँक बसविण्यात यावा. सर्व एलएमओ व पीएसए प्लांट सुरू करून पहावे. जिल्ह्यात कोरोना संसर्ग सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे. ओमायक्रॉन या नविन व्हेरिएंटचे रुग्ण असल्यास त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा तातडीने शोध घ्यावा. त्यांची तपासणी करून घ्यावी.

जिल्ह्यात पहिली ते ८ वीपर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याबाबत पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी सूचना देऊन शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या १७ पीएसए प्लांट, ४ एलएमओ प्लांट व ४५ ड्युरा सिलिंडरमधून ९९.९०  मेट्रिक टन ऑक्सिजनची तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यात पहिल्या डोसचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे, तर दुसऱ्या डोसचे काम ६५ टक्के पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात सध्या रेमडेसिवीर औषधांचा ५२९८ पुरवठा आहे, अशी माहिती यावेळी आरोग्य यंत्रणेने दिली.  बैठकीला संबंधित यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.