जिल्ह्यातील बेकायदेशीर मदरशांवर कडक कारवाई करा; धर्मांतरणासाठी पैशांचे आमिष देणाऱ्यांकडे पैसा येतो कुठून याची चौकशी करा! विश्व हिंदु परिषदेची जिल्हाधिकारी,एसपींकडे मागणी

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अकोला जिल्ह्यातील आलेगाव धर्मांतरण प्रकरणी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. सदर प्रकरणाचे घटनास्थळ हे उदयनगरचा मदरसा असल्याचे धर्मांतरीत मुलाच्या आईने तक्रारीत म्हटल्याने बुलडाणा जिल्ह्यातही या घटनेचे पडसाद उमटत आहेत.   
आज,१४ जुलै रोजी उदयनगर येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने बंद पुकारण्यात आला होता. या बंदला उस्फुर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून स्वतः उपविभागीय पोलिस अधिकारी दिवसभर उदयनगर येथे ठाण मांडून होते. दरम्यान आज दुपारी विश्व हिंदू परिषदेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. जिल्ह्यातील बेकायदेशीर मदरशांवर कडक कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.
धर्मांतरित तरुणाच्या कुटुंबीयांना इस्लाम धर्म न स्वीकारल्यास जीवाने मारू अशी धमकी दिली. त्यामुळे बेकायदेशीर धार्मिक धर्मांतरण अध्यादेश २०२० हा केंद्रीय कायदा आहे, त्याद्वारे धमकी देणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईची मागणीही निवेदनातून करण्यात आली. धर्मांतरण करण्यासाठी त्यांच्याकडून पैशांचे आमिष देण्यात आले, त्यामुळे एवढा पैसा त्यांच्याकडे येतो कुठून याचीही चौकशी होण्याची गरज असल्याचे विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा महामंत्री माधव धुंदाळे यावेळी म्हणाले.