बी बियाणेच्या नावाखाली शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवा! अन्यथा तीव्र आंदोलन करू, देऊळगाव राजा तालुका काँग्रेसचा इशारा..

 
देऊळगाव राजा (राजेश कोल्हे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. यंदा मुबलक प्रमाणात पाऊस असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी पेरणीच्या कामाला लागले आहेत. दरम्यान, आवश्यक तशी बी बियाणी खरेदी करण्यासाठी शेतकरी कृषी केंद्रावर जातात. परंतु त्यांची लूट होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बियाणेबाबत सविस्तर तपशील देवून शेतकऱ्यांसाठी योग्य दरात उपलब्ध करून द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करू. असा इशारा देऊळगाव राजा तालुका काँग्रेस कमिटीने दिला आहे. यासंदर्भात काल ९ जून रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.
   बी बियाणेच्या नावाखाली विविध ठिकाणी शेतकऱ्यांची लूट सुरू असल्याचे आपण उघड्या डोळ्यांनी बघतोय. मागील वर्षी दुष्काळामध्ये आधीच शेतकरी होरपळून निघाला आहे. यंदा चांगल्या पावसाचा अंदाज असल्याने शेतकरी कामाला लागले आहेत. पेरणीसाठी आवश्यक अशी बी बियाणे खरेदी करण्यासाठी कृषी केंद्रावर निघाले आहेत. तिथे सुद्धा संपूर्ण तालुक्यात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट सुरू आहे. शेतकऱ्यांना पाहिजे ते बी बियाणे योग्य दरात उपलब्ध झाले पाहिजेत, कोणत्या कंपनीची बी बियाणे कुठल्या कृषी केंद्रावर किती प्रमाणात उपलब्ध आहेत व किती शेतकऱ्यांना वाटप केले. यासंदर्भातील सगळा सविस्तर तपशील शेतकऱ्यांसमोर सादर करावा. अन्यथा देऊळगाव राजा तालुका कृषी कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस मनोज कायंदे, रमेश कायंदे, दिलीप सानप, लक्ष्मण कव्हळे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गजानन काकड, शहराध्यक्ष विष्णू झोरे, हनीफ शहा, गजानन तिडके, अशोक डोईफोडे, अमर शेटे, गणेश सरोदे यांच्यासह काँग्रेसच्या अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.