राजर्षी शाहू परिवाराने घेतलेल्या दुग्ध व्यवसाय व पशुपालन मार्गदर्शन कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद; डॉ.महेश पारखे म्हणाले,प्रशिक्षण घेतल्यास दुग्ध व्यवसायात प्रगती शक्य;

संदीप शेळकेंनी दिला दूध उत्पादकांच्या पाठीशी उभे राहण्याचा शब्द...

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): व्यवसाय कुठलाही असो त्याचे प्रशिक्षण घेणे आवश्यक असते. त्याशिवाय तो व्यवसाय चांगल्या पद्धतीने करता येत नाही. आपल्याकडे शेती, दुग्ध उत्पादन, पशुपालन यासारखे व्यवसाय करतांना योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षण घेतले जात नाही. प्रशिक्षण घेऊन दुग्ध व्यवसाय केल्यास उत्तम प्रगती साधता येते, असे प्रतिपादन अहमदनगरचे पशुवैद्यकीय तज्ञ डॉ. महेश पारखे यांनी केले.
धाड येथील जिजाऊ ज्ञान मंदिरमध्ये ७ जुलै रोजी आयोजित दुग्ध व्यवसाय व पशुपालन मार्गदर्शन कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष तथा वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके होते. मंचावर जिल्हा दुग्धविकास अधिकारी डॉ. दिवाकर काळे, अमर डेअरीचे विजय हडपे, 
अनंता भोंडे, संतोष गुजर, मंगेश गिरी, डॉ. सचिन देव्हाने यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलतांना डॉ. महेश पारखे म्हणाले, आज शेतीमध्ये बेसुमार खतांचा वापर वाढला आहे. १ ग्रॅम मातीमध्ये १ कोटी जिवाणू असायला हवे होते. मात्र खतांच्या बेसुमार वापराने आता १ ग्रॅम मातीत १० ते १२ लाख जिवाणू आढळतात. त्यामुळे शेतीचा पोत ढासळला असून सरासरी उत्पन्न घटले आहे. 
दुग्ध व्यवसायाची परिस्थिती सुद्धा अशीच आहे. दुग्ध व्यवसायाबाबत योग्य मार्गदर्शन, प्रशिक्षण घेण्याकडे आपण दुर्लक्ष करतो. त्याचा परिणाम असा झाला की, पूर्वी आपल्याकडे ३० ते ४० लिटर दुध देणाऱ्या गायी होत्या. आज हा आकडा १० ते १२ लीटरवर आला आहे. पंजाबमध्ये सरासरी ४० लिटरपर्यंत दूध उत्पादन होते. कारण तेथील शेतकऱ्यांनी योग्य प्रशिक्षण घेतले आणि त्याची अंमलबजावणी केली. आपल्याकडे ही बाब गांभीर्याने घेणे गरजेचे असल्याचे डॉ. पारखे म्हणाले.  
दुग्ध उत्पादकांच्या खंबीरपणे पाठीशी - संदीप शेळके
शेतकऱ्यांनी दुग्ध उत्पादन, पशुपालनाकडे वळावे, असे आपण नेहमी सांगत आलो आहे. आजही आपल्याकडे दुग्ध उत्पादनाकडे मूळ व्यवसाय म्हणून बघितले जात नाही. त्यामुळे शेतकरी, पशुपालकांचे नुकसान होत आहे. योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षण घेतल्यास दुग्ध व्यवसायात प्रगती साधता येते. दुग्ध उत्पादकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण खंबीरपणे त्यांच्या पाठीशी असल्याचे संदीप शेळके म्हणाले. 
दुग्ध उत्पादकांचा झाला सत्कार
धाड परिसरात दुग्ध व्यवसाय चांगला वाढला आहे. त्यामुळे बोदवड येथील अमर डेअरीने आपले युनिट येथे सुरु केले. परिणामी परिसरात दुग्ध उत्पादनाला चांगले दिवस आले आहेत. त्यामुळे कार्यक्रमाच्या निमित्ताने संतोष गुज्जर, विष्णू दोडे, अभिषेक पायघन, समाधान बुधवत, रणजित देव्हाणे, संदीप चांदा, समाधान तायडे, राजेंद्र काळे, समाधान काळे, आनंदा भोंडे, आत्माराम नरवाडे, ज्ञानेश्वर उपडे यासह इतर दूध उत्पादकांचा सत्कार करण्यात आला.