जिल्ह्याच्या सुपुत्राला सियाचिन मध्ये वीरमरण! अग्निवीर होऊन झाले होते केवळ ९ महिने; शेतकरी आईवडिलांना एकुलता एक एक मुलगा होता अक्षय; सोमवारी होणार अंत्यसंस्कार!

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई येथील वीर जवान अक्षय लक्ष्मण गवते(२०) यांना सियाचीन मधील याचीन ग्लेशीअर मध्ये कर्तव्यावर असताना वीरमरण आले. २० ऑक्टोबरच्या रात्री ११ वाजून ३५ मिनिटांनी रुग्णालयात त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला,त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अक्षय यांच्यावर सोमवारी २३ ऑक्टोबरला सकाळी जन्मगावी अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने दिली आहे.
 ३० डिसेंबर २०२२ रोजी अक्षय "अग्नीवीर" म्हणून सैन्यात भरती झाले होते. सियाचीन मधील याचीन ग्लेशीअर मध्ये ते कर्व्यावर होते. जिल्हा सैनिक कार्यालयाला प्राप्त माहितीनुसार प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना सैनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र काल रात्री ११ वाजून ३५ मिनिटांनी त्यांना तीव्र हृदयविकाराचा धक्का आला त्यातच त्यांचा मृत्यू झाला. उद्या सायंकाळी इंडिगो विमानाने अक्षय यांचे पार्थिव छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आणण्यात येईल. सोमवारी सकाळी पार्थिव छत्रपती संभाजीनगर वरून पिंपळगाव सराई येथे आणण्यात येईल. तिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील..
 आईवडिलांना एकुलता एक..
देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या अक्षय यांचे शिक्षण पिंपळगाव सराई येथील जनता विद्यालयात झाले. सैनिक भरतीची तयारी करीत असताना गेल्या वर्षी त्यांची अग्नीवीर मध्ये भरती झाली. अक्षय आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. अक्षय यांना एक लहान बहीण, अक्षय यांचे आईवडील शेती करतात. अक्षय यांच्या मृत्यूची वार्ता कळताच पिंपळगाव सराई गावावर शोककळा पसरली आहे..