Amazon Ad

विविध प्रलंबित मागण्यांसाठी सिंदखेड राजा तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन!

 
सिंदखेडराजा (ऋषी भोपळे : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) विविध प्रलंबित मागण्या संदर्भात सिंदखेड राजा तहसील कार्यालयासमोर आज १० जुलै रोजी ज्ञानेश्वर खरात यांच्यासह अन्य तरुणांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. मागण्या मान्य करा अन्यथा इथेच मुक्काम करणार असल्याचा इशारा संतप्त युवकांनी दिला आहे.
 ज्ञानेश्वर खरात म्हणाले, तालुक्यातील हिवरा गडलिंग रस्त्याच्या वर्क ऑर्डरवर तहसीलदार सही करत नाही. यामुळे रस्त्याचे काम सुरू झालेले नाही. ऐन पावसाळ्यात शेतकऱ्यांची शेतात जाण्यासाठी दैना होत आहे. जोपर्यंत तहसीलदार वर्क ऑर्डरवर सही करणार नाही तोपर्यंत आपण येथून जाणार नसल्याचा इशारा खरात यांनी दिला. तसेच तहसील कार्यालयातून नागरिकांना सन्मानजनक वागणूक मिळावी, तालुक्यातील शेतकऱ्यांचे शेतरस्त्यांचे वाद मिटविले पाहिजे यामुळे शेकडो शेतकऱ्यांना मानसिक त्रास होत आहे.
तहसीलदार आणि इतर कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी झाली पाहिजे, कार्यालयातील कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी होणे गरजेचे असून प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता येणे गरजेचे आहे. इतर काही कामांसाठी कोणी लाच मागत असल्यास सोडणार नाही असा इशारा युवकांनी बोलून दाखविला. जोपर्यंत स्वतः तहसीलदार येवून गडलिंग गावातील शेत रस्त्याच्या वर्क ऑर्डरवर सही करत नाही, तोपर्यंत कार्यालयासमोरच मुक्काम करणार असल्याचा इशारा आंदोलक ज्ञानेश्वर खरात यांनी दिला. यावेळी ज्ञानेश्वर खरात, गणेश राजपूत, अजय कऱ्हाडे, संतोष खरात, देविदास मानतकर, विनोद मानतकर, यांच्यासह अन्य शेतकरी उपस्थित होते.