साहेब पगार कशाचा घेता हो! जिल्हाधिकारी कार्यालयात लंच टाईमच्या नावाखाली ऑफिसला दांड्या! सायबांना जेवायला लागतात दोन दोन तास..खातात तरी किती?

 
yfufy
बुलडाणा(राहुल रिंढे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  १३ तालुक्यांचा जिल्हा असलेल्या बुलडाणा जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयात जनतेची कामे व्हावीत हे अपेक्षित असते.कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी श्री. तुम्मोड हे त्याबाबतीत कायम आग्रही असतात. मात्र जिल्हाधिकाऱ्यांची नजर चुकवून कार्यालयातील विविध अधिकारी ,कर्मचारी हे कामचुकारपणा करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. दुपारच्या लंच ब्रेकच्या नावाखाली अधिकारी २ - २ तास दांड्या मारत मारत असल्याचे बुलडाणा लाइव्ह च्या पाहणीत समोर आले.

 नियमानुसार एकाच कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी एकाच वेळी लंच ब्रेक न घेता अर्धा - अर्धा तास विभागून ब्रेक घेणे अपेक्षित असते. कार्यालय प्रमुखाने तशी रचना करायची असते. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागात दुपारी दीड नंतर शुकशुकाट दिसून येतो. दुपारी दिडला लंच साठी गेलेले अनेक अधिकारी साडेतीन पर्यंत कार्यालयात येत नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या नागरिकांना ताटकळत बसावे लागते. त्यामुळे हे सायब खातात तरी किती हो? हे पगार घेतात कशाचा असा संतापजनक सवालही नागरिक करतांना दिसतात.
  
साहेब जेवायला गेले, साडेतीन पर्यंत आलेच नव्हते..!

  आज,२ मार्चला एक शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. पीएम किसान योजनेचे अलीकडील तीन हप्ते त्यांना मिळाले नाहीत. आधी ते , बुलडाणा तहसील कार्यालयात गेले होते,मात्र तिथून त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवले. मात्र संबधित विभागात गेल्यानंतर त्यांना साहेब जेवायला गेल्याचे त्यांना सांगण्यात आले. दुपारी साडेतीन पर्यंत ते साहेब कार्यालयात परतले नव्हते. त्यामुळे दुपारच्या उन्हात शेतकऱ्याला बराच वेळ ताटकळत बसावे लागले.