आम्ही जगावं की मरावं? बिबी परिसरातील शेतकऱ्यांचा सरकारला आर्त सवाल; कारणच तसे आहे....
Jul 7, 2024, 09:36 IST
बिबी (जयजित आडे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) बिबी परिसरात वन्य प्राण्यांचा धुमाकूळ सुरू असून नुकत्याच पेरलेल्या कोवळ्या पिकांचे नुकसान होत आहे. यामुळे, शेतकरी त्रस्त असून वन्य प्राण्यांचा बंदोबस्त लावण्याची मागणी बिबी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.
सुरुवातीला पाऊस झालेला नसला तरीही शेतकऱ्यांनी सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद, अशा पिकांची पेरणी केली. पीक जमिनीच्या वर येताच वन्यप्राणी या पिकांची नासाडी करीत आहेत. वन्यप्राणी शेतात धुमाकूळ घरात असून शेतकरी चिंतेत आहेत. या परिसरात मोठ्या प्रमाणात नीलगाय, रोही, रानडुक्कर, माकड अशा वन्य प्राण्यांचा वावर असतो. पैशांची जमवाजमव करून पिकांची लागवड करतात पण, कोवळ्या पिकांचे नुकसान होत असेल तर शेतकरी मेटाकुटीला येत आहे. यामुळे वनविभागाने वन्य प्राण्यांचा योग्य तो बंदोबस्त लावून शेतकऱ्यांची अडचण दूर करावी व झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी परिसरातून होत आहे.