चंदनपूर हत्याकांड प्रकरणात धक्कादायक खुलासे! बायको अन् ३ महिन्याच्या मुलीला सोडून आला होता आरोपी जाकीर; आधारकार्ड देखील बनावट! एप्रिल महिन्यापासून गायब होती पीडित अल्पवयीन मुलगी;

आज चिखलीत झाले अंत्यसंस्कार! हिंदु संघटनांची ठाणेदारांवर नाराजी कायम! अप्पर पोलीस अधीक्षकांनी सांगितलं आतापर्यंत काय झालं, पुढे कशी असेल तपासाची दिशा(पहा व्हिडिओ)

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  चिखली तालुक्यातील चंदनपुर येथे १३ ऑगस्टच्या रात्री अल्पवयीन मुलीचा गळा आवळून खून करण्यात आला होता. पोलिसांनी २४ तासांच्या आत आरोपींना अटक केली होती. दरम्यान आता या प्रकरणात आरोपी पोलीस कोठडीत असून त्यांच्या चौकशीतून धक्कादायक बाबी समोर येत आहेत. 
 

पश्चिम बंगालमधील दक्षिण दिजनापुर जिल्ह्यातील कुमारगंज पोलीस ठाण्यात एप्रिल महिन्यात अज्ञात आरोपीविरुद्ध अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल होता. मात्र असे असले तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीचा खून करणारा आरोपी जाकीर याच्याशी पीडित मुलीची ओळख अलीकडील १० ते १५ दिवसांतील आहे. जाकीर याचे लग्न झालेले असून त्याला ३ महिन्यांची मुलगी देखील आहे. एप्रिल महिन्यात पीडित मुलीला  दुसऱ्याच एका मुलाने वेगवेगळे आमिष दाखवून पळवले होते, मात्र नंतर दोघांत बिनसल्यानंतर तिची जाकीर सोबत जवळीक वाढली होती. जाकीर सोबतच ती पुण्याला आली, यावेळी जाकीरचा जवळचा नातेवाईक असलेला अलीमोद्दीन मिया हा देखील त्यांच्यासोबत पुण्याला आला. जाकीर पुण्याला आला त्यावेळी अल्पवयीन मुलीसह त्यांच्यासोबत एकूण १५ जण होते,त्यात ३ महिलांसह १२ पुरुष होते. पुण्यातून जाकीर, अलिमोद्दीन मियां आणि अल्पवयीन मुलगी असे तिघे चंदनपुरला आले. मात्र चंदनपुर मध्ये थ्रेशर मालकाला जाकिर ने स्वतःचे नाव छोटू, अलीमोद्दीन चे नाव रजत उर्फ राहुल तर मुलीचे नाव अंजली उर्फ मिस्ट्री असल्याचे सांगितले..

अप्पर पोलीस अधीक्षकांनी सांगितलं आतापर्यंत काय झालं, पुढे कशी असेल तपासाची दिशा(पहा व्हिडिओ)

 जाकिरकडे बनावट आधार कार्ड?
 
दरम्यान पोलीस तपासात जाकीर चे आधार कार्ड बनावट असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांना या प्रकरणात अनेक प्रश्नांची उकल करणे आहे. आरोपी भारत - बांगलादेश सीमा प्रदेशातील रहिवाशी आहेत, बनावट आधार कार्ड बनवून भारतात प्रवेश केल्याच्या अनेक घटना याआधी इथे उघडकीस आल्या आहेत, त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित हा मुद्दा असल्याने आरोपींच्या बाबतीत तसे काही ना याबाबत देखील पोलिसांना तपास करावा लागणार आहे. आज,१९ ऑक्टोबरला हत्याकांड प्रकरणातील मृतक मुलीचे वडील आणि नातेवाईक चिखली येथे पोहचले. उपजिल्हा रुग्णालयातील शवागृहात मुलीचा मृतदेह पाहून वडिलांना अश्रू अनावर झाले. घटना उलटून ६ दिवस झाल्याने मृतदेह पश्चिम बंगालला नेणे शक्य नसल्याने चिखली येथेच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

 मुलीचे नातेवाईक आरोपींना ओळखत नाहीत...
 
दरम्यान मृतक मुलीचे वडील, नातेवाईक आरोपींना ओळखत नसल्याचे समोर आले आहे. काल, दोन्ही आरोपींना न्यायालयाने १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली, त्यामुळे आता या दिवसांत अनेक महत्वपूर्ण खुलासे होणार आहेत. हे प्रकरण मानवी तस्करी शी संबंधित आहे का? याचाही तपास पोलीस करणार आहेत. ते १५ मजूर पश्चिम बंगाल मधून कुणाच्या सांगण्यावरून पुण्यात आले या बाबी पोलीस तपासणार आहे. त्यासाठी आरोपींना घेऊन पोलिसांचे पथक पुण्याला देखील जाणार आहे. 


हिंदु संघटनांची नाराजी कायम, ठाणेदारांच्या निलंबनाची मागणी..!

दरम्यान याप्रकरणी चिखलीत काल, हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढत अंढेरा पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांच्या चुकांवर बोट ठेवले होते. ठाणेदार पाटील यांनी तपासात अनेक चुका केल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे. प्रकरण गंभीर असताना पोलिसांनी पंचनामा करतांना व्हिडिओ शूटिंग केले नाही, पोस्टमार्टम इन कॅमेरा केले नाही असा आरोप करीत ठाणेदारांच्या निलंबनाची मागणी केली आहे.