धक्कादायक ब्रेकिंग! बुलडाण्यात तब्बल ४५ कोरोना सुपर स्प्रेडर निघाले पॉझिटिव्ह!!

 
file photo
बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलडाणा शहरातील कोरोना वाढीचा वेग किती, कसा व का भयावह आहे, याचे एक प्रमुख  कारण आज, १२ जानेवारीला झालेल्या सुपर स्प्रेडरच्या कोरोना तपासणी अंती स्पष्ट झाले. महाचाचणी शिबिरामध्ये दहा वीस नव्हे तब्बल ४५ विक्रेते कोरोना पॉझिटिव्ह असल्याची अशुभ वार्ता कळाली!  यामुळे नगरपालिका यंत्रणेसह प्रशासन हादरले असून, या तपासण्या बंधनकारक करण्यात आल्या तर ही आकडेवारी किती भयावह असेल या नुसत्या कल्पनेनेच तज्‍ज्ञांना कापरे सुटले आहे!!

बुलडाणा शहर व परिसरात कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण व ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेता कोरोना सुपर स्प्रेडरसाठी महाचाचणी शिबीर घेण्यात आले. तब्बल ३० केंद्रांवर कोरोनाविषयक रॅपिड टेस्ट करण्यात आल्या. विविध व्यावसायिक, व्यापारी प्रतिष्ठाने, भाजीपाला - फळ विक्रेते, खाद्य व अन्य पदार्थांची विक्री करणारे आदी कोरोना सुपर स्प्रेडर म्हणून ओळखले जातात. यामुळे व शहरातील कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता प्रशासनाने या मेगा कॅम्प चे आयोजन केले होते.

आज सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेदरम्यान पार पडलेल्या या शिबिरात  व्यापारी, व्यावसायिक, विक्रेते आदींची कोरोनाविषयक रॅपिड टेस्ट करण्यात आल्या. लहान मोठ्या, मध्यम, किरकोळ व्यापारी, विक्रेत्यांचा फारसा प्रतिसाद मिळाला नसला तरी यावेळी ५८३ जणांची जलद चाचणी करण्यात आली. यापैकी तब्बल ४५ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. याची टक्केवारी पावणे आठ टक्के इतकी असल्याने कोरोनाचा धोका किती वाढला हे स्पष्ट झाले.

जिल्हाधिकारी कार्यालय, नगर परिषद, सुंदरखेड बसस्थानक, शबनम कॉम्प्लेक्स, बाजार समिती, दत्त मंदिर धाड नाका, महात्मा फुले शाळा, मातृभूमी व्यायाम शाळा, डीएसडी मॉल, एआरडी मॉल, संगम चौक, सहकार विद्या मंदिर, डॉ. पिंपरकर दवाखाना, न. पा. शाळा क्रमांक २, इकबाल चौक, सराफा गल्ली, लद्धड हॉस्पिटल, संभाजी नगर, सामाजिक न्याय भवन, एसबीआय कोषागार कार्यालय, सैनिकी मंगल कार्यालय, प्रशासकीय इमारत, उर्दू शाळा कारंजा चौक या ठिकाणी चाचण्या झाल्या. बुलडाणा तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी, न. पा. मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका कर्मचारी, डॉक्टर, आशा वर्कर, अंगणवाडी सेविकांनी परिश्रम घेतले.