धक्कादायक BREAKING! भगर खाल्ल्याने ३०० जणांना विषबाधा; सप्ताहात एकादशी निमित्त होता भगरीचा प्रसाद;

दवाखान्यात जागा नाही म्हणून दवाखान्याच्या झाडाला दोरी टांगून सलाईन लावाव्या लागल्या; लोणार तालुक्यातील खापरखेड व सोमठाणा येथील घटना
 
लोणार(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोणार तालुक्यातून एक धक्कादायक आणि तेवढीच खळबळजनक बातमी समोर आली आहे. हरिनाम सप्ताहात एकादशी निमित्त भगरीचा प्रसाद होता, तो खाल्ल्याने जवळपास ३०० जणांना विषबाधा झाली आहे. रात्रीपासून दवाखान्यात रुग्णांचा ओघ सुरू आहे. लोणार तालुक्यातील सोमठाणा व खापरखेड येथील हे बाधित रुग्ण आहेत.
 प्राप्त माहितीनुसार खापरखेड व सोमठाणा या दोन गावांच्या मध्ये असलेल्या भगवान काळू नाडे यांच्या शेतातील विठ्ठल रखुमाई मंदिरात १४ फेब्रुवारी पासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू होता. काल,२० फेब्रुवारीला सप्ताहाच्या ७ व्या दिवशी एकादशी असल्याने भाविकांसाठी भगरीचा प्रसाद केलेला होता. दरम्यान प्रसाद खाल्ल्यानंतर घरी गेलेल्या भाविकांना अचानक मळमळ, उलटी, चक्कर, संडास अशी लक्षणे सुरू झाले. रुग्णांना बिबी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले, तिथे एकापाठोपाठ एक रुग्णांची संख्या वाढू लागली. वैद्यकीय अधीक्षक रुग्णालयात हजर नसल्याने मदतीसाठी खाजगी डॉक्टरांना पाचारण करावे लागले. रुग्णांची संख्या अधिक असल्याने व हॉस्पिटल मध्ये तेवढे बेड नसल्याने दवाखान्याच्या बाहेर मोकळ्या मैदानात ताडपत्री टाकून झाडाला दोरी टांगून रुग्णांना सलाईन देण्यात आले.काही रुग्णांना लोणार येथील शासकीय रुग्णालयात तर काहींना खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.