धक्कादायक ; जावायाची सासरवाडीत आत्महत्या ! मंदिरातील घंटीला लटकलेले आढळले..

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) सागवान येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे. गावातील देवीच्या मंदिरात ३९ वर्षीय व्यक्तीने घंटीला भगव्या कपड्याने गळफास घेतला. आज सकाळी ६ वाजता ही धक्कादायक घटना उघडकीस आली. गावातील काही लोक कामानिमित्त बाहेर जात असताना सर्वात आधी त्यांना हे दृश्य दिसले. यांनतर संपूर्ण सागवान परिसरात एकच खळबळ उडाली. 
गजानन गुंजाळ असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. गुंजाळ हे अंभोड्याचे रहिवासी असून ते शेतमजुरीचे काम करतात. सागवान ही त्यांची सासरवाडी आहे. पत्नी माहेरी आली असता, पत्नीला भेटण्यासाठी ते बुधवारी सागवान येथे आले होते. दरम्यान, रात्री काय झाले कुणास ठाऊक? सकाळी थेट त्यांचा मृतदेहच आढळला. गुंजाळ यांनी अचानक आत्महत्या का केली? याचे गूढ अद्याप कायम आहे. त्यांच्या नातेवाईकांनी बुलडाणा लाइव्हला दिलेल्या माहितीत सांगितले की, गुंजाळ हे अतिशय नम्र स्वभावाचे होते. त्यांना कुठलेही व्यसन नव्हते. सागवान गावचे पोलीस पाटील जाधव यांनी प्रथम पोलिसांना माहिती दिली. यांनतर पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा करीत असताना गुंजाळ यांचा मृतदेह मंदिराच्या घंटीला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. गुंजाळ यांचा मृतदेह शविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला असून शवविच्छेदनाचे कार्य सुरू आहे.