धक्कादायक! मृत्यूची संख्या जास्त की ५० हजारांचा मोह? कोरोनाचे बळी ६७६ अन्‌ अनुदानासाठी आलेत तब्‍बल तीनपट अर्ज!!

 
file photo
बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आजवरच्या कालावधीत कोरोनाने ६७६ बळी घेतले असल्याची शासन व प्रशासनाकडे नोंद आहे. मात्र राज्य शासनाने जाहीर केलेल्या अनुदान योजनेसाठी जिल्ह्यातून तब्बल तीनपट अर्ज आल्याने मृत्यू संख्या जास्त आहे की अनुदानासाठी भरमसाठ अर्ज आले, असा यक्षप्रश्न ऐरणीवर आलाय! पात्र उमेदवारांना अनुदान मिळणे सुरू झाले असल्याने यंत्रणांना अति काटेकोरपणे व खातरजमा करूनच आर्थिक सहाय्य मंजूर करावे लागणार असे चित्र आहे.

राज्य शासनाने नुकतेच कोविड-१९ मुळे दगावलेल्या व्यक्तीच्या निकटतम नातेवाईकास ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची योजना जाहीर केली. यासाठी विकसित करण्यात आलेल्या वेबपोर्टलवर कमीत कमी कागदपत्रासह अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते. ज्या व्यक्तींची केंद्र शासनाकडे कोविडमुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे अथवा कोविडमुळे मृत्यू झाल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र आहे.

त्यांच्या नातेवाईकांचा अर्ज, कोणत्याही कागदपत्राशिवाय मंजूर करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले. ज्यांच्याकडे असे प्रमाणपत्र नसेल तर त्यांना अर्जासोबत कोविडमुळे मृत्यू झाल्याच्या पुष्ट्यर्थ कागदपत्रे द्यावी लागतील, असे स्पष्ट करण्यात आले होते. अर्ज नामंजूर झाल्यास जिल्हा शल्य चिकित्सक तक्रारीवर सुनावणी करून निर्णय देतील व अर्ज अंतिमतः मंजूर करण्याचे अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास असल्याचे नमूद निर्णयात नमूद करण्यात आले.

अबब! १९०० अर्ज?
दरम्यान, योजना जाहीर झाल्यावर पोर्टलवर जिल्ह्यातील "त्या' नागरिकांचे  मोठ्या संख्येने अर्ज आलेत.  आज अखेर तब्बल १९०० अर्ज प्राप्त झाले असून एकही फेटाळण्यात आला नाहीये. लॉगिन व अन्य तांत्रिक अडचणीमुळे १२७४ अर्ज जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे प्रलंबित असले तरी त्यावर लवकरच कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. उर्वरितपैकी ३०३ अर्ज मंजूर करण्यात आले असून, २४३ जणांना अनुदान मंजूर करण्यात आले आहे. काही नातेवाईकांच्या बँक खात्यात अनुदान जमा झाले आहे. मात्र १९००  अर्ज आल्याने जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा काहीसे थक्क झाल्याचे चित्र आहे.