धक्कादायक! दरवाजा आतून लावून घेत महिला सदस्यांसोबत गैरवर्तन!; देऊळघाटच्या ग्रामपंचायतीतील प्रकार

 
file photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या देऊळघाटमध्ये महिला सदस्यांसोबत गैरवर्तनाचा प्रकार समोर आला आहे. सरपंचांचा कक्ष आतून बंद करून सदस्यानेच महिला सदस्यांसोबत गैरवर्तन केले. अश्लील शिविगाळ करत धमक्या देत लोटपोट केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्‍यामुळे खळबळ उडाली असून, गैरवर्तन करणाऱ्या सदस्याविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी ७ ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

देऊळघाट ग्रामपंचायतीत ११ जानेवारीला मासिक सभा होती. सभेत गावातील मुद्यांवर चर्चा सुरू असताना सरपंच, सचिव व विरोधी सदस्यांत काही मुद्द्यांवरून वाद निर्माण झाला. सरपंच व सचिवांना गावातील सुविधांबाबत तसेच गावात चालू असलेल्या कामाची माहिती विचारली असता सरपंच सभा सोडून त्यांच्या कक्षात निघून गेले. तेव्हा महिला सदस्या त्यांच्या वॉर्डातील  सुविधांबाबत तक्रार करण्यासाठी व प्रस्तावित कामाची माहिती मिळवण्याकरिता सरपंचांच्या कक्षात गेल्या.

चर्चा सुरू असताना अब्दुल रज्जाक अब्दुल सत्तार हे सरपंचांच्या कक्षात आले व आतून दरवाजा लावून घेतला आणि महिला सदस्यांना अश्लील भाषेचा वापर करून धमक्या देत लोटपाट केली, असा आरोप जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. गोंधळाचा आवाज ऐकून उपसरपंच आरिफ खान व सदस्य मुश्ताक अहमद सरपंचांच्या कक्षाजवळ आले व त्यांनी आवाज देऊन सरपंचांना दरवाजा उघडायला लावला व महिला सदस्यांना बाहेर काढले. त्यामुळे महिला सदस्यांच्या अधिकारांना काळीमा फासणारे ग्रामपंचायत सदस्य अब्दुल रज्जाक अब्दुल सत्तार यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्या संगीता दिलीप खराडे, परवीन जावेद खाँ पठाण, कामनाबाई सखाराम पाचपोर, शहेदा बी मनशाउर रहेमान, आशिया बी सफिरोद्दिन, मुस्ताक अहेमद गुलाम अहेमद व आरिफ खान हबीब खान यांनी निवेदनात केली आहे.