शिवजयंती सोहळ्यात विविध कार्यक्रमातून होणार शिवविचारांचा जागर! शस्त्र प्रदर्शनी, संस्कार व्याख्यान, शिवज्योत व मोटार सायकल रॅली, स्फूर्तीगीतांचा बहारदार कार्यक्रम...
मिरवणुकीत हत्ती,घोडे, उंट अन् बरच काही...
सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे दमदार आयोजन!
Feb 15, 2024, 19:31 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): "शिवजयंती करूया लोकोत्सव" हे ब्रीद घेऊन बुलढाण्यात अभूतपूर्व शिवजयंती साजरा होणार आहे. सोहळ्यात विविध कार्यक्रमातून शिव विचारांचा जागर होणार आहे. त्यामध्ये शस्त्र प्रदर्शनी, संस्कार व्याख्यान, स्फूर्ती गीतांचा बहारदार कार्यक्रम, भव्य शिवज्योत मोटार सायकल रॅली अश्या कार्यक्रमांचा समावेश आहे. त्यामुळे एकूणच बुलढाण्यात शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व ठरणार. असे प्रतिपादन सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती २०२४ चे अध्यक्ष आमदार संजय गायकवाड यांनी केले.
शिवजयंती सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यामध्येच उद्या १६ फेब्रुवारीला शस्त्र प्रदर्शनी व अश्वप्रदर्शनी होणार आहे. कोण हेरिटेज पुणे, सचिव राकेश राव यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या हस्ते प्रदर्शनीचे उद्घाटन होणार आहे.त्यानंतर १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९:३० वाजता आई बाप समजावून घेताना याविषयी प्रसिद्ध युवा प्रबोधनकार ह भ प सोपान महाराज कनेरकर यांच्या संस्कार व्याख्याणाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या हस्ते होणार आहे. वरील दोन्ही कार्यक्रम जिजामाता प्रेक्षागार येथे होणार आहे. रविवारी दिनांक १८ फेब्रुवारीला सायंकाळी ४ वाजता युवा नेते मृत्युंजय गायकवाड यांच्या हस्ते "जागर मात्र तीर्थाच्या शिवज्योतीचा" या मोटार सायकल रॅलीचे उद्घाटन होणार रॅलीला सहकार विद्या मंदिर येथून सुरुवात होणार असून पुढे सायंकाळी सुप्रसिद्ध गायिका, हे भगवा रंगफेम....शहनाज अख्तर यांचा स्मृतिगीतांचा कार्यक्रम येथील गांधी भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे उपस्थित असतील.
१९ फेब्रुवारीला बुलडाणा भगवामय!
शिवजयंती दिनी संपूर्ण शहर भगवमय होणार आहे. विशेष म्हणजे २ हजारापर्यंत भगव्या साडी महिलांना मिळणार आहे. विशेष म्हणजे सायंकाळची मिरवणूक डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरणार! सायंकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत शहरात शिवजयंतीचा उत्साह पहायला मिळणार आहे. मिरवणुकीत हत्ती, घोडे, उंट, यासह प्रेरणादायी देखाव्यातून जयंती उत्सवाला विशेष महत्त्व लाभले आहे.