बुलडाण्यात माहौल शिवजयंतीचा! बुलडाणेकरांच्या डोळ्यांचे पारणे फिटले; डॉ. शोन चिंचोले म्हणाले, शिवविचार जीवन समृद्ध करण्याचा मूलमंत्र ! आ. गायकवाडांनी दिला शिवस्मारक लवकर पूर्ण करण्याचा शब्द

 
yiyu
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार शेकडो वर्षानंतर आजही तितकाच टवटवीत आहे. लाखो लोक शिवराय या शब्दावर आजही प्रेम करतात. जीवन समृद्ध कसे करावे हे शिवचरित्र शिकविते हा मूलमंत्र घेण्याचा दिवस म्हणजे शिवजयंती होय. असे प्रतिपादन सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. शोन चिंचोले यांनी केले.  शिवरायांसारखा महापुरुष जगात होणे नाही. जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत शिवराय देखील आहेत. असे प्रतिपादन जिल्ह्याचे माजी पालकमंत्री ज्येष्ठ नेते डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी शिवजन्मोत्सवाच्या भरगच्च कार्यक्रमात केले.

gyy

 शिवजन्मोत्सव सोहळा गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. आज, १९ फेब्रुवारीच्या सकाळी मुख्य सोहळा जिजामाता प्रेक्षागार येथे भव्य मंचावर पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. शोण चिंचोले होते. तर मुख्य अतिथी म्हणून आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार संजय गायकवाड ,आमदार धीरज लिंगाडे ,शेतकरी नेते रविकांत तुपकर ,माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ,माजी आमदार विजयराज शिंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, ओम सिंग राजपूत, सुरेश देवकर, जयश्री ताई शेळके,वंदनाताई निकम,डॉ. अनंत शिरसाट, डॉ. विकास बाहेकर, एन एच पठाण, टी डी अंभोरे ,प्रा. गोपाल सिंग राजपूत, प्रा. शाहिनाताई पठाण, अंजली परांजपे,साहित्यिक सदानंद देशमुख यांच्यासह सर्व माजी अध्यक्ष व विविध समित्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान खासदार प्रतापराव जाधव यांनीही कार्यक्रमास भेट देऊन महाराजांना अभिवादन केले.

सकाळी साडेनऊला  विधिवत शिवपूजन पार पडले. पारंपारिक पद्धतीने  हेलगे दाम्पत्य यांनी पाळणा सादर केला. यानंतर जिजाऊ वंदना घेण्यात आली. योगा ग्रुप खामगाव च्या वतीने शंखनाद करण्यात आला. शिवरायांच्या वेशभूषेतील विशाल शेळके यांचा मान्यवरांनी विशेष सन्मान केला.

 पुढे बोलताना डॉ. शोन चिंचोले म्हणाले की, सर्वानुमते अध्यक्ष म्हणून निवड प्रक्रिया पार पडली ही जबाबदारी माझ्यावर देण्यात आली. ती पेलण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले. वर्षभर शिवजन्म सोहळा साजरा केला जाणार आहे. यासाठी घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. प्रास्ताविकातून समिती सचिव सुनील सपकाळ यांनी बुलडाण्यात होणारी शिवजयंती राज्यास नव्हे तर देशासाठी पथदर्शक असल्याचे सांगून महिलांचा आदर करणे हे धोरण महाराजांनी शिकवले त्यानुसार आजच्या शिवजयंतीमध्ये महिलांचा विशेष सहभाग असल्याचे सांगितले. शस्त्र व शास्त्र या दोन्हीवर देखील सपकाळ यांनी भाष्य केले. या कार्यक्रमासाठी विविध समित्यांनी          परिश्रम घेतले. कुठलाही कार्यक्रम तडीस नेण्यासाठी काही बॅक स्टेज कार्यरत असतात शिवजयंती उत्सवाचा भार रणजीतसिंग राजपूत, राजेश हेलगे,डॉ. राजेश्वर उबरहंडे, सागर काळवाघे, एडवोकेट जयसिंग राजे देशमुख, मृत्युंजय गायकवाड, प्राध्यापक अनिल रिंढे,पत्रकार गणेश निकम याणी भुमीका पार पाडली. पत्रकार राजेंद्र काळे यांनी मुख्य कार्यक्रमाचे  तर पत्रकार रणजित सिंग राजपूत यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे बहारदार संचलन केले. संपूर्ण राज्याने आदर्श घ्यावा असा अभूतपूर्व शिवजन्म सोहळा बुलडाण्यात पार पडला.

 महिला डॉक्टरांनी स्टेज गाजविले...

 उच्चशिक्षित डॉक्टर्स मंडळी यंदाच्या शिवजयंतीत हिरीरीने सहभागी झाली. स्त्री रोग तज्ञ डॉ. अस्मिता चिंचोले ढोल पथक प्रमुख होत्या. या पथकात शहरातील उच्चशिक्षित महिला डॉक्टरांनी अतिशय सुंदर ढोल वादन केले. तर डॉ. आरती जोशी, डॉ. दिपाली पाटील, डॉ. सौ वैशाली निकम, डॉ. सौ मोरे, डॉ. सौ.साबळे, डॉ.सौ मेहेत्रे, डॉ. सौ. पाटील यांच्यासह इतर डॉक्टर  महिलांनी सांस्कृतिक स्टेज गाजवून सोडले.

शिवस्मारक लवकरच पूर्ण

 जिल्हा मुख्यालयी दगडी बांधकामात होत असलेले भव्य शिवस्मारक लवकरच पूर्ण करू अशी ग्वाही शिवजयंती कार्यक्रमात बोलताना आ. संजय गायकवाड यांनी दिली. हे शिवस्मारक आगामी काही दिवसात तडीस नेण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. महापुरुषांचे स्मरण व्हावे यासाठी बुलडाण्यात विविध स्मारके उभे करण्याचे काम आ.गायकवाड यांच्या माध्यमातून होत आहे.