"बुलडाणा लाइव्ह" च्या ज्ञानेश्वर ताकोते पाटलांना शेगाव गुण गौरव पुरस्कार प्रदान! ताकोते पाटील म्हणाले, जबाबदारी वाढली...

 
Takote
शेगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): समाजासाठी झटणाऱ्यांच्या वाट्याला अनेकदा चटके येत असले तरी कधी तरी अशा व्यक्तिमत्वाची समाज दखल घेतोच. "बुलडाणा लाइव्ह" या जिल्हाभरात अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या व दररोज साडेतीन लाख वाचक संख्या असलेल्या न्युज पोर्टलचे घाटाखालील विशेष प्रतिनिधी ज्ञानेश्वर ताकोते पाटील यांच्या  प्रामाणिक पत्रकारितेची दखल शेगावकरांनी घेतली. १८ फेब्रुवारीच्या सायंकाळी रंगलेल्या एका सोहळ्यात ज्ञानेश्वर ताकोते पाटील यांना शेगाव गुण गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. याशिवाय दैनिक  तरुण भारतचे धडाडीचे पत्रकार संजय त्रिवेदी यांनाही शेगाव गुण गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

   संत नगरी शेगाव येथील श्री गणेश प्रस्थ मंगल कार्यालयात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या प्रारंभी शिवव्याख्याते ओम शिंदे, कु.कांदबरी ढमाळ आणि  साक्षी अरबट यांचे शिवव्याख्यान पार पडले. त्यानंतर विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव सोहळा पार पडला. पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल बुलडाणा लाइव्ह चे विशेष प्रतिनिधी ज्ञानेश्वर ताकोते आणि संजय त्रिवेदी यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष  शकुंतलाताई बुच,  श्रीकांत शेळके, कवी नितीन वरणगावकर, विलास शेट्टे, श्रीकांत हाके, माजी नगरसेवक संदीप काळे, शिवसेनेचे उमेश शेळके, नागेश फासे, बंडू ढमाळ, शिवा इंगळे, ज्ञानेश्वर गारमाडे, उमेश पारखेडे, प्रशांत नांदोकर, रोहित पत्रिकर, मंगेश देशमुख, अविनाश खरारे, जाणता राजा सेवा ग्रुप चे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

   
ज्ञानेश्वर ताकोते पाटील म्हणतात...!

 ज्या भुमित वाढलो तिथल्या माझ्या माणसांनी केलेल्या या सन्मानामुळे मी भारावून गेलो आहे. बुलडाणा लाइव्ह च्या माध्यमातून गेल्या अडीच वर्षांपासून सातत्याने घटना - घडामोडी, उपेक्षितांचे प्रश्न समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. शेगावकरांनी केलेल्या या सन्मानाबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. आता सन्मान मिळाल्यामुळे कामाची जबाबदारी आणखी वाढली आहे. सन्मानाला न्याय देण्यासाठी भविष्यात प्रयत्न करत राहील अशी प्रतिक्रिया ज्ञानेश्वर ताकोते पाटील यांनी दिली आहे. बुलडाणा लाइव्ह परिवाराने श्री. ताकोते यांचे अभिनंदन केले आहे.