दुसरबीडमध्ये सव्वाशे अतिक्रमणे जमिनदोस्त!

महामार्ग ५-६ मिटरच उरला होता, आता पुन्हा मोकळा श्वास घेणार!!
 
 
file photo

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीडमधून जाणारा मुंबई - नागपूर महामार्ग वाढत्या अतिक्रमणांमुळे अरूंद झाला आहे. नाल्यादेखील बुजविण्यात आल्याने सांडपाणी वाहनांसोबत महामार्गावरून धावते. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावूनही स्वतःहून अतिक्रमण न काढण्यात आल्याने आज, २४ नोव्‍हेंबरला पोलिसांची मदत घेऊन प्राधिकरणाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या अतिक्रमणावर बुलडोझर चालवला. सकाळपासून रात्रीपर्यंत ही कारवाई सुरू होती. दिवसभरात सव्वाशेच्या आसपास अतिक्रमणे जमिनदोस्त करण्यात आली. उद्यासुद्धा ही कारवाई केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अतिक्रमणे काढण्यात आल्याने दुतर्फा ८० फुटांपर्यंतचा रस्ता मोकळा श्वास घेणार आहे. अतिक्रमणांमुळे बसथांब्यावर सतत वाहतूक कोंडी होत असते. महामार्गाच्या दोन्ही बाजूने अतिक्रमण वाढल्याने रस्ता ५ ते ६ मीटरच उरला. यामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याने मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहनधारकांना व पादचाऱ्यांना ये-जा करणे अवघड झाले आहे. प्रवाशांना जीव मुठीत घेऊन बसथांब्यावर उभे रहावे लागत होते. रस्ता मोकळा झाल्याने सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाकडे या मार्गाची देखरेख आहे. रस्त्याच्या मध्यापासून १५ मीटर हद्दीतील टपरी, शेड, बांधकाम तसेच मुरूम भराव काढण्याला सकाळी सुरुवात करण्यात आली आहे.